शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत : जून महिना संपूनही शिवारे दिसू लागली सुनसान
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड, यमनापूर परिसरात आर्द्रा नक्षत्रातील पावसाला तुरळक सुरुवात झाल्यामुळे जमिनीमध्ये ओल निर्माण झाली आहे. परिसरातील शेतकरी वर्ग पुढे पाऊस होईल, या आशेवर ओलीमध्ये भात पेरणीची कामे करीत आहे. ढगाळ वातावरण आहे, पण अजुनही दमदार पाऊस कधी पडतो म्हणून शेतकरीवर्ग आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. यावर्षी पावसाचा अंदाज चुकत आहे. आर्द्रा नक्षत्रामध्ये प्रत्येकवर्षी भरपूर पाऊस पडतो. पेरणी, बटाटे लागवडीबरोबरच भात रोपलागवड आदी कामे युद्धपातळीवर सुरू असतात. परंतु यावर्षी रोहिणी-मृग ही दोन्ही नक्षत्रे तर अगदी कोरडीच गेली. आशा होती आर्द्रा नक्षत्राच्या पावसाची, परंतु या नक्षत्राला सुरुवात होऊन आठ-दहा दिवस झाले तरीसुद्धा दमदार पाऊस नसल्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे.
भात रोप लागवडीची चिंता
प्रत्येक वर्षी आर्द्रा नक्षत्राच्या पावसामध्ये भातरोप लागवडीची धांदल सुरू असायची. परंतु यावर्षी आर्द्रा नक्षत्रातसुद्धा भरपूर पाऊस नसल्यामुळे अजून शिवारामध्ये पाणी झाले नाही. शिवारामध्ये पॉवर ट्रिलरचा आवाज, भात रोप लागवडीवेळी महिला-पुरुषांनी फुलून जाणारे शिवार अगदी सुन्न दिसत आहे.
पावसाळी बटाटा लागवड नामशेष
कंग्राळी किर्यात परिसरामध्ये 25 वर्षांपूर्वी हजारो पिशव्या पावसाळी बटाटे लागवड केली जात होती. परंतु बेळगाव शहर गावापासून अवघ्या दोन-तीन कि.मी.वर असल्यामुळे कंग्राळी परिसरातील माळ शेतजमिनीमध्ये बेळगाव शहराच्या उपनगरांची निर्मिती झाली. परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक गरजेपोटी जमिनीची विक्री केली आणि बघता बघता परिसरातील सर्व माळ जमिनीमध्ये काँक्रिटची जंगले तयार झाली. यामुळे परिसरामध्ये पावसाळी बटाटे लागवड कालबाह्या झाल्याचे दिसून येत आहे.
काळे तीळ, नाचणा कालबाह्या
एकेकाळी कंग्राळी परिसरातील माळशेतीमध्ये काळे तीळ व नाचणा पीक अमाप घेण्यात येत होते. तिळाच्या पिकाला पिवळी फुले आल्यावर पिवळसर दिसणारा संपूर्ण माळशिवार, नाचणा पिकाच्यासुद्धा घरोघरी बैलजोडीच्या साहाय्याने मळण्या होतानाचे दृष्य नयनरम्य होते. आता त्याच माळजमिनीमध्ये सारी घरे झाल्याने काळे तीळ व नाचणा पीक कालबाह्या झाल्याचे दिसून येत आहे
ऊस लागवडीवर भर
मध्यंतरी साखर कारखानदारांकडून उसाची उचल वेळेत होत नसल्यामुळे ऊस पिकाला फाटा देऊन परिसरातील शेतकरी भात व इतर पिकांकडे वळला होता. परंतु सध्या साखर कारखानदारांची संख्या वाढल्यामुळे तसेच प्रति टनाला 3000 ते 3200 पर्यंत दर मिळत असल्यामुळे शेतकरीवर्ग पुन्हा ऊस पिकाकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे परिसरामध्ये ऊस पिकाची अधिक लागवड करण्यात येत आहे.









