सकाळी एका पक्षाच्या आवाजाने जाग आली. काल पेपरमध्ये मान्सूनची बातमी यायला आणि पावशा यायला एकच वेळ झाली. तो दिसत नव्हता पण त्याची लगबग जाणवत होती. दरवषी आम्हा सगळय़ांसाठी जिजिविषेची पेरणी करायला येणारा पावशा. पेर्ते व्हा म्हणणारा पावशा शेतकऱयाला संदेश देतो खरा पण मी देखील माझ्या मनाची मशागत करायला घेतली. शब्दांचा धांडोळा घेतला आणि लक्षात आलं अहंकाराचे तण आधी काढल्याशिवाय पेरणी करता येणार नाही.
काय बरं पेरावे? दोडके, कार्ले, घोसाळे, भोपळा, चवळी चटकन येणारं बियाणं. कारल्याचा कडूपणा, घोसाळय़ाचा मवाळपणा एकूणच या सगळय़ा भाज्या ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या प्रकारातील, आमच्या स्वभावाची ओळख देणाऱया. लेटय़ूस, ब्रोकोली, सोयाबीन, मश्रूम आमच्यातल्या तारूण्याचे प्रतीक तर शेवरीचा कापूस आणि चाफ्याच्या निष्पर्ण फांद्या वार्धक्मयाच्या आवडीनिवडी सारख्या वाटतात.
भुईमूग, हरभरा, मका, बोरं, आवळे, चिंचा बालपणाला बागडायला सगळे रान हिरवंगार करतात. मनाच्या तळाशी या बियाबरोबर चिंचोके, सागरगोटे बिट्टय़ा, आणि रंगबिरंगी दगडसुद्धा सापडले. एक दगड दाताच्या आकाराचा…..दात जमिनीत पुरला की नवीन दात मिळतो ही विजिगिषा आम्हाला जन्मजात असतेच. त्यामुळेच तर आम्ही कडुनिंबाच्या किंवा पिंपळाच्या बिया कधी साठवायचो नाही. तिथे भूतं राहतात आणि मुलांना घेऊन जातात ही भिती. आंबा फणसाभोवती लपाछपीचा खेळ खेळताना परत आईच्या कुशीत शिरायला मिळणार ही खात्री मनावर कोरलेली असते.
तरूण वयात आल्यावर गुलाब, जाई, जुई याची निवड करणारे आम्ही आमचं भविष्य निश्चित करताना सुखाचे हिंदोळे अनुभवत जगायला लागतो. या सगळय़ा पेरणीच्या कामात आम्ही अनेक संकटाशी दोन हात करायला कधी शिकलो ते कळतही नाही पण ही जगण्याची धडपडच आम्हाला जगवते.
जपानमध्ये समुद्रात मासेमारीसाठी लोक जायचे, मासे पकडायचे पण किनाऱयावर येईपर्यंत मासे मरून जायचे. यावर उपाय म्हणून जहाजावर एक गोडय़ा पाण्याचा टँक बनवला त्यात हे मासे सोडून एक मोठा मासा सोडला. तो आपल्याला खाईल या भितीने हे सगळे मासे हालचाल करत राहीले आणि जिवंत राहीले. आमची सगळय़ाची अवस्था या छोटय़ा माशासारखीच झालीये. कोरोनासारखे मोठे मासे आमच्यातली जिजीविषा जागी करतायत. त्याला जोड द्यायला आमच्या मनातील मशागत आणि पेरणी उपयोगी ठरणार आहेत.
आंबा, फणसाची कुटुंब वत्सलता, बोरी बाभळीची वैफल्यावस्था, प्राजक्त, मोगरा, गुलाबाचे अलवारपण सगळेच आपल्याला काहीतरी देऊन जातात. आपण केलेल्या पेरणीची कृतज्ञता भरभरून देताना आमचे वसंत ऋतू बहरत राहतात. पेर्तेपणाचं कर्तेपण मुलाबाळांवर छाया धरायला एक आनंदाचे पर्व सुरू करते आणि निष्पर्ण चाफासुद्धा फुलून येतो एका वेगळय़ा जिजीविषेच्या प्रवासासाठी……








