वृत्तसंस्था/बेंगळूर
सारांश जैन आणि कुमार कार्तिकेय यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर येथे गुरूवारपासून सुरू झालेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात मध्य विभागाने आपली स्थिती मजबूत करताना दक्षिण विभागाचा पहिल्या डावात 149 धावांत खुर्दा केला. जैनने 49 धावांत 5 तर कार्तिकेयने 53 धावांत 4 गडी बाद केले. दिवसअखेर मध्य विभागाने बिनबाद 50 धावा जमविल्या. या सामन्यात मध्यविभागाने नाणेफेक जिंकून दक्षिण विभागाला प्रथम फलंदाजी दिली. दक्षिण विभागाच्या पहिल्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. जैन आणि कार्तिकेय यांच्या फिरकीसमोर दक्षिण विभागाच्या एकाही फलंदाजाला अधिकवेळ खेळपट्टीवर राहता आले नाही. 16 व्या षटकात मध्य विभागाने आपल्या फिरक गोलंदाजांकडे चेंडू सोपविला. सलामीचा मोहीत काळे कार्तिकेयच्या गोलंदाजीवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात त्रिफळा चीत झाला. त्याने 6 धावा जमविल्या. उपाहारावेळी दक्षिण विभागाची स्थिती 33 षटकात 4 बाद 64 अशी होती. तन्मय अगरवालने सावध फलंदाजी करत 76 चेंडूत 3 चौकारांसह 31 धावा जमविल्या. दरम्यान तो एकेरी धाव घेताना खेळपट्टीच्या मध्यभागी रिकी भुईला जोरात धडक दिली आणि तो धावचीत झाला. कार्तिकेयने मोहम्मद अझरुद्दीनचा त्रिफळा उडविला.
उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रामध्ये दक्षिण विभागाच्या फलंदाजांनी केवळ मैदानावर हजेरी लावली. रिकी भुईने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. सिद्धार्थने 1 चौकारासह 12 धावा केल्या. कार्तिकेयने त्याला झेलबाद केले. सलमान निझारने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 24 धावा जमविल्या. केरळच्या या फलंदाजाला जैनने पाटीदारकरवी झेलबाद केले. निझार बाद झाल्यानंतर मध्य विभागाच्या गोलंदाजांना दक्षिण विभागाचा डाव गुंडाळण्यात अधिक विलंब लागला नाही. अंकित शर्माने 2 चौकारांसह 20 धावा केल्या. सारांश जैनने 49 धावांत 5 तर कुमार कार्तिकेयने 53 धावांत 4 गडी बाद केले. जैनने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये नवव्यांदा एका डावात पाच गडी बाद केले आहेत. तर दुलीप करंडक स्पर्धेतील त्याची ही दुसरी खेप आहे. या स्पर्धेतील गेल्या आठवड्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जैनने पश्चिम विभागाच्या डावात 84 धावांत 5 गडी बाद केले होते. दक्षिण विभागाचा डाव 63 षटकात 149 धावांवर आटोपला. मालेवार आणि अक्षय वाडकर यांनी मध्य विभागाच्या पहिल्या डावाला सावध सुरूवात करताना दिवसअखेर बिनबाद 50 धावा जमविल्या. मालेवारने गुरूजपनित सिंगच्या एका षटकात दोन चौकार सलग ठोकले. पण दिवसअखेर दक्षिण विभागाला मध्य विभागाची ही सलामीची जोडी फोडता आली नाही. मालेवार 60 चेंडूत 3 चौकारांसह 28 तर अक्षय वाडकर 52 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावांवर खेळत आहे. मध्य विभागाचा संघ आता नवव्या धावांनी पिछाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण विभाग प. डाव 63 षटकात सर्वबाद 149 (तन्मय अगरवाल 31, रिकी भुई 15, सलमान निझार 24, सिद्धार्थ 12, अंकित शर्मा 20, सारांश जैन 5-49, कार्तिकेय 4-53), मध्य विभाग प. डाव बिनबाद 50 (दानिश मालेवार खेळत आहे 28, अक्षय वाडकर खेळत आहे 20)









