प्रवासी-मालवाहतुकीत वाढ; सरव्यवस्थापकांची माहिती
बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेच्या रेल्वे सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी हुबळी येथील रेलसौध कार्यालयात पार पडली. नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. 2024-25 या आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत नैर्त्रुत्य रेल्वेला एकूण 4720 कोटींचा नफा झाला असून यापैकी 1629 कोटी रुपये हे प्रवासी वाहतुकीतून मिळाल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली.
नैर्त्रुत्य रेल्वेच्या रेल्वेसेवा वेळेत असल्यामुळे वक्तशीरपणात 86 टक्के गुण मिळाले आहेत. नोव्हेंबरपर्यंत 28.34 कोटी टन मालाची वाहतूक रेल्वेतून करण्यात आली आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी महसुलामध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. जुलै महिन्यात प्रवासी वाहतुकीतून सर्वाधिक म्हणजेच 286 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेतून रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तात्काळ तिकीट बुकिंग करता येत आहे. त्याचबरोबर हुबळी, बेळगावसह महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर एटीएमप्रमाणे युटीएस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लांबपल्ल्याच्या 9 गाड्यांचा विस्तार करण्यात आला आहे. 404 विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. 1429 नवे कोच एक्स्प्रेसला जोडण्यात आले आहेत. प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी गोव्याचे आमदार निलेश काब्राल यांच्यासह अतिरिक्त सरव्यवस्थापक के. एस. जैन उपस्थित होते. यावेळी उत्तम कार्य केलेल्या हुबळी व बेंगळूर विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.









