विजयकुमार विशाख : 76 धावांत 5 बळी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर दक्षिण विभागाला विजयासाठी 194 धावांची जरुरी आहे.
या सामन्यात उत्तर विभागाचा प. डाव 198 धावावर आटोपल्यानंतर दक्षिण विभागाने पहिल्या डावात 195 धावा जमवल्याने उत्तर विभागाला तीन धावांची आघाडी मिळाली. उत्तर विभागाने 2 बाद 51 या धावसंख्येवरून आपल्या दुसऱ्या डावाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा डाव 56.4 षटकात 211 धावात आटोपला. प्रभसिमरन सिंगने 93 चेंडूत 11 चौकारासह 63, अंकितकुमारने 3 चौकारासह 26, हर्षित राणाने 1 षटकार आणि 4 चौकारासह 38, प्रशांत चोप्राने 4 चौकारासह 19, निशांत सिंधूने 2 चौकारासह 15 धावा जमवल्या. दक्षिण विभागातर्फे विजयकुमार विशाखने 76 धावात 5 तर साईकिशोरने 28 धावात 3 आणि कविरप्पाने 47 धावात 2 गडी बाद केले. दक्षिण विभागाला निर्णायक विजयासाठी 215 धावांचे आव्हान उत्तर विभागाकडून मिळाले. दिवसअखेर द. विभागाने दुसऱ्या डावात बिनबाद 21 धावा जमवल्या. साई सुदर्शन 5 तर मयांक अगरवाल 15 धावावर खेळत आहेत. या सामन्यातील खेळाचा एक दिवस बाकी असून दक्षिण विभागाला विजयासाठी आणखी 194 धावांची गरज आहे.
संक्षिप्त धावफलक : उत्तर विभाग प. डाव 58.3 षटकात सर्वबाद 198, दक्षिण विभाग प. डाव 54.4 षटकात सर्वबाद 195, उत्तर विभाग दु. डाव 56.4 षटकात सर्वबाद 211 (शोरे 5, प्रशांत चोप्रा 19, कालसी 29, प्रभसिमरन सिंग 63, अंकितकुमार 26, निशांत सिंधू 15, हर्षित राणा 38, विजयकुमार विशाख 5-76, साई किशोर 3-28, कविरप्पा 2-47), दक्षिण विभाग दु. डाव 6.3 षटकात बिनबाद 21.









