महाभियोग प्रस्ताव संमत, मार्शल लॉ लागू करणे भोवले, 204 सदस्यांचे विरोधात मतदान
वृत्तसंस्था / सोल
दक्षिण कोरीयाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांची अखेर गच्छंती झाली आहे. त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव या देशाच्या संसदेत सादर करण्यात आला होता. तो पुरेशा मतांनी संमत करण्यात आल्याने त्यांना राष्ट्राध्यक्षपदाचा त्याग करावा लागला आहे. 3 डिसेंबर या दिवशी त्यांनी देशात आणीबाणी लागू करुन मार्शल लॉ लागू केला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रक्षोभ उसळला होता. तसेच संसदेत त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्तावही सादर करण्यात आला होता.
हा महाभियोग प्रस्ताव दोन तृतियांश बहुमताने संमत होण्याची आवश्यकता होती. दक्षिण कोरीयाच्या संसदेची सदस्यसंख्या 300 आहे. हे सर्व सदस्य शनिवारी महाभियोगावर मतदान करण्यासाठी सभागृहात उपस्थित होते. त्यांच्यापैकी 204 सदस्यांनी प्रस्तावाच्या पक्षात मतदान केल्याने तो संमत झाला. विरोधी पक्षांप्रमाणे सत्ताधारी पक्षांच्या काही सदस्यांनीही प्रस्तावाला समर्थन दिले होते. गेल्या आठवड्यात हा प्रस्ताव फेटाळला गेला होता. त्यावेळी समर्थकांची संख्या पुरेशी नव्हती. परिणामी, तो पुन्हा मांडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी या प्रस्तावावर सर्व सदस्यांच्या उपस्थितीत चर्चा आणि मतदान झाले.
मार्शल लॉ केवळ सहा तास
3 डिसेंबरला रात्री अचानकपणे येओल यांनी देशात मार्शल लॉ लागू झाल्याची घोषणा केली होती. तसेच त्यांनी संसद परिसरात सेनेच्या तुकड्याही नियुक्त करण्याचा आदेश दिला होता. तथापि, या देशातील विरोधी पक्ष, सत्ताधारी युतीतील काही पक्ष आणि सर्वसामान्य जनता यांनी या निर्णयाला विरोध केला. अवघ्या तीन तासांमध्ये या देशातील जनता रस्त्यांवर उतरली होती आणि त्यामुळे येओल यांच्यावर प्रचंड दबाव येऊन त्यांना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला होता. अवघ्या सहा तासांमध्ये देशातील मार्शल लॉ उठविण्यात यश आले होते.
40 वर्षांमध्ये प्रथमच
या देशात मार्शल लॉ आणला जाण्याची ही गेल्या 40 वर्षांमधील प्रथमच वेळ होती. येओल यांनी असा निर्णय का घेतला, हे अद्यापही एक गूढ आहे. दक्षिण कोरीयातील विरोधी पक्ष उत्तर कोरीयाच्या हुकूमशाही प्रशासनाशी मिळालेले आहेत. त्यामुळे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत देशात आणीबाणी लागू करणे आणि देश सेनेच्या आधीन करणे याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही, असे कारण येओल यांनी देशाला दिलेल्या संदेशात दिले होते.
नंतर भूमिका परिवर्तन
मार्शल लॉ हटविल्यानंतर काही दिवसांनी दिलेल्या एका मुलाखतीत येओल यांनी त्यांची भूमिका बदलल्याचे दिसून आले होते. देशात बंडाळी माजल्याच्या आरोपाचा इन्कार करत मार्शल लॉ देशाचे प्रशासन सुधारण्यासाठी उचललेले एक पाऊल होते, अशी सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, त्यांची कारणमीमांसा कोणालाही पटली नव्हती. त्यांच्यावर पदत्याग करण्याचा दबाव वाढतच होता.
गुन्हेगारी गटांवर आरोप
देशात गुन्हेगारी वाढली असून त्यांच्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. देश हळूहळू त्यांच्या हातात जात आहे. मी माझी सर्व शक्ती एकवटून देशाला अराजकाच्या स्थितीकडे नेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. गुन्हेगारी टोळ्यांनी साऱ्या देशाला वेठीस धरले असून सर्वसामान्यांना भीतीच्या छायेत जगावे लागत आहे, अशी मांडणी करण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला होता.
प्रयत्न असफल
स्वत:ला महाभियोगापासून वाचविण्याचे अनेक प्रयत्न त्यांनी केले होते. सत्ताधारी युती आपल्या पाठीशी राहील अशी त्यांना आशा होती. तथापि, त्यांच्या कृतीमुळे जनतेत प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाल्याने त्यांचे सर्व प्रयत्न विफल ठरले. विरोधी पक्षांना सत्ताधारी युतीतील काही लहान पक्षांचे समर्थन लाभले. अशा प्रकारे महाभियोगाची पार्श्वभूमी तयार झाली होती. अखेर शनिवारी त्यांना जावे लागणार हे स्पष्ट झाले होते. त्यांच्या गच्छंतीमुळे या देशाने मोकळा श्वास घेतला आहे.
पुरेशा मतांनंतर प्रस्ताव
ड दक्षिण कोरीयाच्या विरोधी पक्षांकडून महाभियोग प्रस्तावाच्या चर्चेचा प्रारंभ
ड सर्व सदस्य संसदेत उपस्थित राहिल्याने मतदानात महाभियोग प्रस्ताव संमत
ड विरोधकांना सत्ताधारी युतीतील काही पक्षांचेही सहकार्य लागल्याने सहज यश
ड महाभियोगानंतर विरोधी पक्षांकडून समाधान व्यक्त, जनतेलाही मोठा आनंद









