विरोधी पक्षाकडून महाभियोग चालविण्याची मागणी
वृत्तसंस्था/ सोल
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक योल यांनी मार्शल लॉ हटविण्याची घोषणा केली आहे. देशात अचानक मार्शल लॉ लागू करत योल यांनी पूर्ण जगाला धक्का दिला होता. दक्षिण कोरियात हे कित्येक दशकांमधील सर्वात मोठे राजकीय संकट ठरले होते. नाराज खासदारांनी या आदेशाला सर्वसंमतीने संसदेत फेटाळले आहे. कॅबिनेटने मार्शल लॉ संपुष्टात आणण्यासाठी बुधवारी सकाळी सहमती दर्शविली, तर तेथील संसदेबाहेर मोठ्या संख्येत निदर्शकांनी घोषणाबाजी केली आहे.
विरोधी पक्ष उत्तर कोरियाबद्दल सहानुभूती बाळगून असल्याचा आणि देशविरोधी कारवाया करण्यासोबत सरकारला अस्थिर करू पाहत असल्याचा आरोप अध्यक्षांनी मार्शल लॉ लागू करताना म्हटले होते. तर याच्या काही तासांनी संसदेने ही घोषणा निष्प्रभ ठरविण्यासाठी मतदान केले, ज्यात नॅशनल असेंबलीचे अध्यक्ष वू वोन शिक यांनी खासदार लोकांसोबत मिळून लोकशाहीचे रक्षण करतील अशी घोषणा केली आहे. वू यांनी पोलीस आणि सैनिकांना संसद परिसरातून हटविण्याची सूचना केली आहे.
अध्यक्षांना हटविण्याची तयारी
मार्शल लॉ लागू करण्याच्या पावलाला सत्तारुढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. यात अध्यक्षांच्या पक्षाचे नेते हान डोंग-हून देखील सामील आहेत. अध्यक्षांचा हा निर्णय चुकीचा होता असे म्हणत लोकांसोबत मिळून तो रोखण्याचा संकल्प हून यांनी घेतला होता. तर विरोधी पक्षनेते ली जे-म्यांग यांनी यून यांच्या घोषणेला अवैध आणि घटनाबाह्या ठरविले आहे. अध्यक्षांनी पदत्याग केला नाही तर महाभियोगाची कार्यवाही सुरू करू असे विरोधी पक्षाचे सांगणे आहे. ली जे-म्यांग हे 2022 च्या अध्यक्षीय निवडणुकीत यून यांच्याकडून पराभूत झाले होते. तर अलिकडच्या काळात यून यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली आहे.
अमेरिकेला मिळाला दिलासा
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांकडून मार्शल लॉ हटविण्याची घोषणा करण्यात आल्यावर व्हाइट हाउसला दिलासा मिळाला आहे. अध्यक्षांनी संसदेच्या मताचा आदर केला याचा आम्हाला आनंद असल्याचे व्हाइट हाउसने म्हटले आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी याप्रकरणी कुठलीच ठोस टिप्पणी केलेली नाही. अमेरिकेच्या दूतावासाने स्वत:च्या नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या निदर्शनांमध्ये सामील न होण्याचा सल्ला दिला आहे.









