वृत्तसंस्था/ चेन्नई
येथील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर सुरू झालेल्या 2023 च्या आशियाई चॅम्पियनशिप करंडक हॉकी स्पर्धेत शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात माजी विजेत्या दक्षिण कोरियाने पाकिस्तानला 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. या स्पर्धेमध्ये पाक संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.
या स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात मलेशियाने पाकिस्तानचा 3-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली होती. पाकचा संघ या सलामीच्या पराभवातून अद्याप सावरलेला दिसत नाही. शुक्रवारच्या सामन्यात नवव्या मिनिटाला अब्दुल शाहीदने पाकचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत पाकने कोरियावर 1-0 अशी आघाडी मिळवली. पाकने ही आघाडी सामन्यातील 53 मिनिटापर्यंत राखली होती. दरम्यान 53 व्या मिनिटाला दक्षिण कोरियाला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला आणि त्यांच्या जीहून यांगने या संधीचा पुरेपूर फायदा घेत आपल्या संघाला बरोबरीत नेले. हा सामना सुरू होण्यापूर्वी पाक संघाचा कर्णधार उमर भुट्टा याचा हा द्विशतकी सामना असल्याने हॉकी इंडियातर्फे त्याचा गौरव करण्यात आला.
दक्षिण कोरिया आणि पाक यांच्यातील झालेल्या सामन्यात पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी वेगवान आणि आक्रमक चढायाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही संघांनी गोलपोस्टपर्यंत मजल मारली पण त्यांची फटके सदोष नव्हते. मात्र या कालावधीत अब्दुल शाहीदने पाकचे खाते उघडण्यात यश मिळवले. 20 व्या मिनिटाला पाक संघाचा कर्णधार उमर भुट्टा याला पंचांनी हिरवे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. सामन्याच्या उत्तरार्धात पाकच्या तुलनेत कोरिया आघाडीफळीने वारंवार चढाया करत पाकच्या बचावफळीवर चांगलेच दडपण आणले होते. दोन्ही संघांना या कालावधीत पेनल्टी कॉर्नर्सची संधी मिळाली पण त्याचा लाभ घेता आला नाही. 48 व्या मिनाटला पाक संघातील अकिल अहमदला पंचांनी हिरवे कार्ड दाखवले. 51 व्या मिनिटाला पार्क सॉला पंचांनी हिरवे कार्ड दाखवले. 52 व्या मिनिटाला कोरियाला पंचांनी पेनल्टी कॉर्नर बहाल केला पण तो वाया गेला. यानंतर दक्षिण कोरियाला पेनल्टी स्ट्रोकची संधी मिळाली व यांगने अप्रतिम गोल नोंदवून हा सामना अखेरीस 1-1 असा बरोबरीत सोडवला. आता या स्पर्धेत कोरियाचा पुढील सामना चीनबरोबर तर पाकचा पुढील सामना जपानबरोबर होणार आहे.









