आमदार विजय सरदेसाई यांची मागणी : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना घातले साकडे
प्रतिनिधी / मडगाव
सध्या नवी दिल्ली दौऱ्यावर असलेले गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची भेट घेऊन दक्षिण गोव्यातील विद्यमान जिल्हा ऊग्णालयाचे ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एम्स) मध्ये रूपांतर करावे, अशी मागणी केली आहे.
सरदेसाई यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना गोव्यातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेची माहिती दिली.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचा ताबा खासगी वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्यास विरोध करताना तसे झाल्यास दक्षिण गोव्यातील गरीब ऊग्णांची परवड होईल, याकडे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. दक्षिण गोव्यातील रहिवाशांना आणि विशेषत: सासष्टी तालुक्यातील रहिवाशांना उत्कृष्ट आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही असे यापूर्वी अपण म्हटले होते. या आपल्या वचनाचे पालन करण्यासाठीच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची आपण भेट घेतली, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
या बैठकीत त्यांनी ‘एम्स’सारख्या सुविधा असल्यास राज्याला अनेक फायदे मिळतील आणि त्यात राज्यावर होणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांचा समावेश राहील, असे सांगितले. दक्षिण गोव्यातील हे इस्पितळ ‘एम्स’ झाल्यास त्यात अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासह विस्तृत श्रेणीतील विशेष वैद्यकीय सेवा प्रदान केल्या जातील. यामुळे केवळ आरोग्यसेवा सुलभतेत लक्षणीय सुधारणा होणार नाही, तर विशेष वैद्यकीय उपचार आणि प्रक्रियांसाठी रहिवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची गरज भासणार नाही, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
‘एम्स’मुळे गोव्याला अनेक लाभ
सरदेसाई यांनी मंत्र्यांना अशा उपक्रमामुळे होणार असलेल्या फायद्यांची जाणीव करून दिली. यामुळे आरोग्य सेवेतील प्रतिभावान व्यावसायिकांना राज्यातच कायम ठेवण्याची आणि त्यांच्या संशोधनाला चालना देण्याची संधी मिळेल. गोव्याला एक उत्कृष्ट वैद्यकीय केंद्र म्हणून स्थापित करण्याचे मार्ग खुले होतील. येथे ‘एम्स’ आल्यास अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी भागीदारी होऊन आरोग्यसेवा, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक ऊग्णसेवा यात प्रगती होईल. स्थानिक वैद्यकीय व्यवसायिक आणि संलग्न साहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील. या क्षेत्रात गुंतवणूक करण्याकडे उद्योजक आकर्षित होतील, ज्यामुळे प्रदेश आणि राज्याचा सर्वांगीण आर्थिक विकास होईल, असे त्यांनी सांगितले.
या इस्पितळाचा दर्जा ‘एम्स’इतका वाढविल्यास आरोग्यसेवा पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी विशेष विभागांची स्थापना करणे शक्य होईल. तसेच यामुळे विद्यमान आरोग्य सुविधांवरील ताण कमी होईल आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचे कार्यक्षम व्यवस्थापन करणे शक्य होईल, हे सरदेसाई यांनी याप्रसंगी मंत्र्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.