वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर दक्षिण विभागाने दुसऱ्या डावात 7 बाद 181 धावा जमवत पश्चिम विभागावर 248 धावांची आघाडी मिळवली आहे.
या सामन्यात दक्षिण विभागाचा पहिला डाव 213 धावात आटोपल्यानंतर पश्चिम विभागाने 7 बाद 129 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 146 धावात आटोपला. पश्चिम विभागाचे शेवटचे तीन गडी 17 धावांची भर घालत तंबूत परतले. पश्चिम विभागाच्या डावात पृथ्वी शॉने 9 चौकारासह 65, हार्विक देसाईने 3 चौकारासह 21, कर्णधार पांचाळने 1 षटकारासह 11, अतित शेटने 1 चौकारासह 12 धावा जमवल्या. पश्चिम विभागाच्या उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. दक्षिण विभागातर्फे कविरप्पा प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 53 धावात 7 गडी बाद केले. विजयकुमार विशाख 33 धावात 2 तर कौशिकने एक बळी मिळवला. दक्षिण विभागाने पहिल्या डावात पश्चिम विभागावर 67 धावांची आघाडी घेतली.
दक्षिण विभागाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि दिवसअखेर त्यांनी 60 षटकात 7 बाद 181 धावा जमवल्या. दक्षिण विभागाच्या मयांक अगरवालने 7 चौकारासह 35, कर्णधार हनुमा विहारीने 7 चौकारासह 42, रिकी भुई 4 चौकारासह 37, सचिन बेबीने 4 चौकारासह 28 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 10 तर साई किशोर 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावावर खेळत आहे. पश्चिम विभागातर्फे नागवासवाला, अतित सेट आणि धर्मेंद्रसिंग जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. चिंतन गजाने एक गडी बाद केला. अंधुक प्रकाशामुळे पंचानी खेळ लवकर थांबवला.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण विभाग प. डाव 78.4 षटकात सर्वबाद 213, पश्चिम विभाग प. डाव 51 षटकात सर्वबाद 146 (पृथ्वी शॉ 65, देसाई 21, पांचाळ 11, अतित सेट 12, अवांतर 10, कविरप्पा 7-53, विशाख 2-33, कौशिक 1-26), दक्षिण विभाग दु. डाव 60 षटकात 7 बाद 181 (अगरवाल 35, तिलक वर्मा 3, हनुमा विहारी 42, रिकी भुई 37, सचिन बेबी 28, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे 10, साई किशोर खेळत आहे 16, अवांतर 4, नागवासवाला, अतित सेट, धमेंद्रसिंग जडेजा प्रत्येकी दोन बळी, चिंतन गजा 1-40).









