पश्चिम विभाग 75 धावांनी पराभूत : कवीरप्पाला दुहेरी मुकुट
वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील रविवारी येथे झालेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद दक्षिण विभागाने पटकाविले. या जेतेपदामुळे दक्षिण विभागाचा विजयासाठीचा दुष्काळ संपुष्टात आला. विधिवत कवीरप्पाला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी मुकुट मिळाला.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने पहिल्या डावात 213 धावा जमविल्यानंतर पश्चिम विभागाचा पहिला डाव 146 धावात आटोपल्याने दक्षिण विभागाने 68 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर दक्षिण विभागाचा दुसरा डाव 230 धावात संपुष्टात आल्याने पश्चिम विभागाला निर्णायक विजयासाठी 298 धावांचे आव्हान दक्षिण विभागाकडून मिळाले. या सामन्यातील खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर दोन्ही संघांना विजयाची समान संधी होती. पश्चिम विभागाने 5 बाद 182 या धावसंख्येवरुन रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवसाला आणि आपल्या दुसऱ्या डावाला पुढे प्रारंभ केला. आणि त्यांचे उर्वरित 5 गडी 40 धावात तंबूत परतल्याने दक्षिण विभागाने या स्पर्धेचे अजिंक्यपद हस्तगत केले. कवीरप्पाची आणि साईकिशोर यांची भेदक गोलंदाजी तसेच कर्णधार हनुमा विहारीची समायोचित फलंदाजी दक्षिण विभागाला जेतेपद मिळवून देण्यास महत्त्वाची ठरली.
2010 – 11 नंतर दक्षिण विभागाचे हे पहिले विजेतेपद आहे. दरम्यान 2013 – 14 साली दक्षिण विभागाने उत्तर विभागासमवेत संयुक्त विजेतेपद पटकावले होते. पश्चिम विभागाने रविवारी आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी कर्णधार प्रियांक पांचाळ हा फलंदाज लवकर गमाविला. कवीरप्पाने पांचाळला झेलबाद केले. त्याने 211 चेंडूत 11 चौकारांसह 95 धावा जमविल्या. पांचाळचे शतक 5 धावांनी हुकले. कौशिकने मुल्लानीला 2 धावावर बाद केले. साईकिशोरने धर्मेद्रसिंग जडेजाला 15 धावांवर बाद केले. साईकिशोरने चिंतन गजाला खाते उघडण्यापूर्वीच कौशिककडे झेल देण्यास भाग पाडले. साईकिशोरने सेठला 9 धावावर बाद करुन पश्चिम विभागाचा दुसरा डाव 84.2 षटकात 222 धावांवर संपुष्टात आणला. दक्षिण विभागातर्फे कौशिक आणि साईकिशोर यांनी प्रत्येकी 4 तर कवीरप्पा आणि विशाख यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यात कवीरप्पाने पश्चिम विभागाच्या पहिल्या डावात 7 बळी मिळविले होते. या सामन्यात त्यांनी एकूण 8 बळी तर संपूर्ण स्पर्धेत त्याने 15 गडी बाद करुन सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार पटकाविले.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण विभाग प. डाव 78.4 षटकात सर्व बाद 213, पश्चिम विभाग प. डाव 51 षटकात सर्व बाद 146, दक्षिण विभाग दु. डाव 81.1 षटकात सर्व बाद 230, पश्चिम विभाग दु. डाव 84.2 षटकात सर्व बाद 222 (पांचाळ 95, पुजारा 15, सर्फराज खान 48, जडेजा 15, अवांतर 23, कौशिक 4 – 36, साईकिशोर 4 – 57, कवीरप्पा 1 – 51, विशाख 1 – 39).









