वृत्तसंस्था/ पाँडेचरी
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या देवधर करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या विविध सामन्यात दक्षिण विभाग, मध्य विभाग आणि पश्चिम विभाग यांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदविले. दक्षिण विभागाने पूर्व विभागाचा 5 गड्यांनी, मध्य विभागाने नॉर्थ-ईस्ट विभागाचा 8 गड्यांनी, पश्चिम विभागाने उत्तर विभागाचा 6 गड्यांनी पराभव केला.
दक्षिण विभाग आणि पूर्व विभाग यांच्यातील सामन्यात पूर्व विभागाकडून दक्षिण विभागाला विजयासाठी 229 धावांचे आव्हान मिळाले. दक्षिण विभागाचा सलामीचा फलंदाज मयांक अगरवाल आणि साई सुदर्शन यांनी दमदार फलंदाजी करत आपली अर्धशतके झळकविली. अगरवालने 88 चेंडूत 84 धावा तर साई सुदर्शनने 50 धावा जमविल्या. आकाशदीप 18 धावावर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन आणि अगरवाल यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी नोंदविली. नारायण जगदीशनने 32 धावा जमविल्या. रोहित रायडूने नाबाद 24 तसेच वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 8 धावा जमवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी पूर्व विभागाच्या डावात विराट सिंगने 49, एस. सेनापतीने 44, आकाशदीपने 44 धावा जमविल्या. दक्षिण विभागातर्फे व्ही. कौशिक आणि साई किशोर यांनी प्रत्येकी 3 तसेच कवीरअप्पाने 2 गडी बाद केले.
मध्य विभाग आणि नॉर्थ-ईस्ट यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नॉर्थ-ईस्ट विभागाचा डाव 49 षटकात 164 धावांत आटोपला. मध्य विभागातर्फे आदित्य सरवटने 3 तर यश कोठारी आणि जैन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर मध्य विभागाने 2 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले. शिवम चौधरीने नाबाद 85 तर यश दुबेने 72 धावा जमविल्या. अन्य एका सामन्यात पश्चिम विभागाने उत्तर विभागाचा 6 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात उत्तर विभागाने 50 षटकात 6 बाद 259 धावा जमविल्या. शुभम रोहिलामने नाबाद 56, नितीश राणाने 54, तर एच. राणाने 54 धावा जमविल्या. त्यानंतर पश्चिम विभागाने 48.5 षटकात 4 बाद 260 धावा जमवित विजय नोंदविला. हार्विक देसाईने 56, शिवम दुबेने नाबाद 83 तर के. पटेलने नाबाद 63 धावा केल्या.









