रिकेल्टनचे दमदार शतक, बवूमा, ड्युसेन, मार्करम यांची अर्धशतके, रबाडाचे तीन बळी
वृत्तसंस्था / कराची
चॅम्पियन्स चषक वनडे क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात सलामीचा फलंदाज रेयान रिकेल्टनचे दमदार शतकाच्या जोरावर तसेच कर्णधार बवूमा, व्हॅन डेर ड्युसेन आणि मार्करम यांच्या अर्धशतकांमुळे द. आफ्रिकेने अफगाणचा 107 धावांनी दणदणीत पराभव करुन विजयी सलामी दिली. शतकवीर रिक्लेटोनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने 6 बाद 315 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणचा डाव 43.3 षटकात 208 धावांवर आटोपला. 
या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र द. आफ्रिकेच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. सहाव्या षटकात त्यांचा सलामीचा फलंदाज डी झोर्झी नबीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 11 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. यानंतर मात्र अफगाणच्या गोलंदाजांना यश मिळाले नाही.
रिकेल्टन आणि कर्णधार बवूमा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 129 धावांची भागिदारी केली. 29 व्या षटकात अफगाणच्या मोहम्मद नबीने बवूमाला अटलकरवी झेलबाद केले. त्याने 76 चेंडूत 5 चौकारांसह 58 धावा जमविल्या. बवूमा बाद झाल्यानंतर व्हॅन डेर ड्युसेनने रिकेल्टनला बऱ्यापैकी साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 44 धावांची भर घातली. दरम्यान रिकेल्टनने 101 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह शतक पूर्ण केले. रिकेल्टनने अफगाणच्या फिरकी गोलंदाजीसमोर फुटवर्कचा चांगला उपयोग करत फटके मारले. त्याने पूलचे आक्रमक फटके मारले. 36 व्या षटकात रिकेल्टन धावचित झाला. त्याने 106 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 103 धावा जमविल्या. व्हॅन डेर ड्युसेन आणि मार्करम यांनी चौथ्या गड्यासाठी 47 धावांची भागिदारी केली. नूर अहमदने 43 व्या षटकात व्हॅन डेर ड्युसेनला शाहीदीकरवी झेलबाद केले. त्याने 46 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 52 धावा जमविल्या. ड्युसेनने आपले अर्धशतक 41 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. मार्करमच्या शेवटच्या काही षटकातील फटकेबाजीमुळे द. आफ्रिकेला 300 धावांचा टप्पा ओलांडता आला. मिलरने 18 चेंडूत 1 चौकारासह 14 धावा जमविल्या. जान्सेनला खाते उघडता आले नाही. मार्करमने 33 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. 50 षटकाअखेर द. आफ्रिकेने 6 बाद 315 धावा जमविल्या. मार्करम 36 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 52 तर मुल्डेर 6 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 12 धावावर नाबाद राहिले. द. आफ्रिकेच्या डावात 5 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे मोहम्मद नबीने 51 धावांत 2 तर फरुकी, ओमरझाई आणि नूर अहम्मद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मात्र रशीद खानला 10 षटकात 59 धावांमध्ये एकही गडी बाद करता आला नाही. द. आफ्रिकेने पहिल्या पॉवरप्लेच्या 10 षटकात 46 धावा जमविताना 1 गडी गमविला. त्यानंतर त्यांनी शेवटच्या पॉवरप्लेमध्ये 85 धावांमध्ये 3 गडी गमविले. द. आफ्रिकेचे शतक 119 चेंडूत, द्विशतक 213 चेंडूत तर त्रिशतक 293 चेंडूत नोंदविले गेले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर रेहमत शहा वगळता अफगाणची फलंदाजी सपशेल कोलमडली. रेहमत शहाने 92 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 90 धावांची खेळी करत तो शेवटच्या गड्याच्या रुपात बाद झाला. मात्र अफगाणच्या इतर फलंदाजांकडून त्याला साथ मिळू शकली नाही. अफगाणच्या इतर फलंदाजांना 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाला. गुरबाजने 1 चौकारासह 10, झेद्रानने 1 षटकार 1 चौकारासह 17, अटलने 2 चौकारांसह 16, ओमरझाईने 3 चौकारांसह 18, नबीने 8, नईबने 2 चौकारांसह 13, रशीद खानने 13 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 18 धावा जमविल्या. कर्णधार शाहीदीला खाते उघडता आले नाही. अफगाणच्या डावात 3 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. पहिल्या पॉवरप्लेमध्ये 10 षटकात अफगाणने 38 धावा जमविताना 2 गडी गमविले. दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 151 धावा जमविताना 6 गडी गमविले. शेवटच्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 19 धावांची भर घालताना 2 गडी गमविले. अफगाणचे शतक 152 चेंडूत तर द्विशतक 254 चेंडूत नोंदविले गेले. द. आफ्रिकेतर्फे रबाडाने 3 तर एन्गिडी आणि मुल्डेर यांनी प्रत्येकी 2 तसेच जेनसेन व केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका 50 षटकात 6 बाद 315 (रिकेल्टन 103, बवूमा 58, व्हॅन डेर ड्युसेन 52, एडन मार्करम नाबाद 52, मिलर 14, मुल्डेर नाबाद 12, झोर्झी 11, अवांतर 13, मोहम्मद नबी 2-51, फारुकी, ओमरझाई आणि नूर अहमद प्रत्येकी 1 बळी). अफगाण 43.3 षटकात सर्वबाद 208 (रेहमत शहा 90, रशीद खान 18, झेद्रान 17, ओमरझाई 18, रबाडा 3-36, एन्गिडी 2-56, मुल्डेर 2-36, केशव महाराज व जेनसेन प्रत्येकी 1 बळी).









