इंग्लंडचा 27 धावांनी पराभव, व्हॅन डेर डय़ुसेनचे दमदार शतक, रॉयचे शतक वाया
वृत्तसंस्था/ ब्लोमफाऊंटन
शुक्रवारी येथे झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 27 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघातील व्हॅन डेर डय़ुसेनने शानदार शतक (111) झळकविले. तर इंग्लंडच्या जेसन रॉयचे शतक वाया गेले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 7 बाद 298 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव 44.2 षटकात 271 धावात आटोपला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावामध्ये तिसऱया क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या व्हॅन डेर डय़ुसेनने 117 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 111 धावा झळकविल्या. डेव्हिड मिलरने 56 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 53, डिकॉकने 41 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 37, कर्णधार बेहुमाने 28 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 36, क्लेसनने 32 चेंडूत 2 षटकारांसह 30, तसेच मार्करेमने 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे 6 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे सॅम करन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 35 धावात 3 गडी बाद केले. आर्चर, मोईन अली, आदिल रशिद आणि स्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना जेसन रॉय आणि डेव्हिड मलान यांनी इंग्लंडच्या डावाला दमदार सुरुवात केली. या जोडीने सलामीच्या गडय़ासाठी 146 धावांची भागीदारी केली. जेसन रॉयने 91 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह 113 तर डेव्हिड मलानने 55 चेंडूत 9 चौकारांसह 59 धावा जमविल्या. इंग्लंडचे हे दोन फलंदाज वगळता इतर फलंदाजांना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. कर्णधार बटलरने 4 चौकारांसह 36, आदिल रशिदने 1 चौकारासह नाबाद 14, सॅम करनने 1 षटकारासह 17 तर मोईन अलीने 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे नॉर्जे आणि सिसांदा मगाला हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. नॉर्जेने 62 धावात 4, मगालाने 46 धावात 3, रबाडाने 46 धावात 2 तर शम्सीने 1 गडी बाद केला. इंग्लंडच्या डावामध्ये 5 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. या विजयामुळे आयसीसीच्या पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक सुपरलीग मानांकनात दक्षिण आफ्रिकेने दहावे स्थान मिळविले आहे. 2023 च्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान भारतात होणाऱया विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी मानांकनातील आघाडीच्या आठ संघांना थेट प्रवेश दिला जाईल. मात्र, दक्षिण आफ्रिकेला या स्पर्धेतील प्रवेशासाठी पात्र फेरीचे सामने खेळावे लागतील. चालू वषीच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेतून दक्षिण आफ्रिकेने माघार घेतली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला या आगामी स्पर्धेसाठी थेट प्रवेशाकरिता कसरत करावी लागत आहे. दक्षिण आफ्रिकेने सुपरलीग स्पर्धेतील 17 सामन्यातून एकूण 69 गुण मिळविले असून ते आठव्या स्थानावर आहेत. विंडीजने 88 गुण मिळविले आहेत. नवव्या स्थानावरील लंकेने 77 गुण घेतले आहेत. पुढील आठवडय़ात दक्षिण आफ्रिका संघाचे इंग्लंडविरुद्धचे आणखी दोन सामने बाकी आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ मार्चअखेरीस नेदरलँड्सविरुद्ध दोन वनडे सामने खेळणार आहे. 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रतेची स्पर्धा झिम्बाब्वेत येत्या जून-जुलै दरम्यान खेळविली जाणार आहे. ही पात्र फेरीची स्पर्धा तीन आठवडे चालणार आहे.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका 50 षटकात 7 बाद 298 (व्हॅन डेर डय़ुसेन 111, मिलर 53, डिकॉक 37, बेहुमा 36, मार्करेम 13, क्लेसन 30, सॅम करन 3-35), इंग्लंड 44.2 षटकात सर्वबाद 271 (जेसन रॉय 113, डेव्हिड मलान 59, बटलर 36, सॅम करन 17, आदिल रशिद नाबाद 14, मोईन अली 11, नॉर्जे 4-62, सिसांदा मगाला 3-46, रबाडा 2-46, शम्सी 1-55).









