अवघ्या एका विकेटने पाकचा पराभव : सामनावीर शम्सीचे 4 बळी, मार्करमची झुंजार 91 धावांची खेळी
वृत्तसंस्था/ चेन्नई
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चुरशीच्या झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा एका विकेटने पराभव केला. प्रारंभी, पाकिस्तान संघ 46.4 षटकांमध्ये 270 धावा करून सर्वबाद झाला. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना द.आफ्रिकेची एकवेळ 9 बाद 268 अशी स्थिती झाली होती. पण केशव महाराज व तबरेज शम्सीने या अखेरच्या जोडीने द.आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, चार बळी व अखेरच्या षटकात विजय मिळवून देणाऱ्या तबरेज शम्सीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या विजयासह आफ्रिकेचे सहा सामन्यात 10 गुण झाले असून गुणतालिकेत त्यांनी टीम इंडियाला मागे टाकत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. दरम्यान, या पराभवामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशेला मात्र चांगलाच सुरुंग लागला आहे. पाकिस्तानचा हा सहा सामन्यातील चौथा पराभव ठरला आहे.
प्रारंभी, पाकने विजयासाठी दिलेल्या 271 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या दहा षटकातच आफ्रिकेला दोन धक्के बसले. सलामीवीर व कर्णधार बवुमा 28 धावा काढून बाद झाला तर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये बहरात असलेल्या डिकॉकही फार काळ टिकला नाही. त्याला 24 धावांवर शाहिन आफ्रिदीने बाद केले. ही जोडी बाद झाल्यानंतर उस्मा मीरने ड्युसेनला बाद करत आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. ड्युसेन 21 धावा काढून तंबूत परतला.
मॅरक्रमची झुंजार खेळी
टॉप ऑर्डर स्वस्तात बाद झाल्यानंतर एडन मार्करमने खेळपट्टीवर नांगर टाकत संघाचा विजय निश्चित केला. त्याने 93 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारासह 91 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मार्करम मैदानात असेपर्यंत आफ्रिकेचा विजय निश्चित समजला जात होता, पण मीरने त्याला बाद करत पाकिस्तानला सामन्यात परत आणले. 46 व्या षटकांतील शेवटच्या चेंडूवर शम्सी एलबीडब्लू झाला होता, पण रिह्यू आफ्रिकेच्या बाजूने गेल्याने पाकिस्तानला धक्का बसला आणि हाच सामन्याचा टर्निंग पाँईट झाला. अखेरीस तबरेज शम्सी आणि केशव महाराजने 47.2 षटकांत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. केशव महाराजने चौकार लगावत आफ्रिकेला विजय मिळवून दिला. महाराज 7 धावांवर तर शाम्सी 4 धावांवर नाबाद राहिला. पाककडून शाहिन आफ्रिदीने 3 तर रौफ, मीर व वासीमने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाकिस्तानला अपेक्षेप्रमाणे चांगली सुरुवात करता आली नाही. त्यांचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. अब्दुल्ला शफीक 9 धावा करून बाद झाला तर इमाम उल हक फक्त 12 धावा करून तंबूत परतला. यानंतर कर्णधार बाबर आझम आणि विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानने काही काळ संघाचा डाव सावरला. रिझवानने 27 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. रिझवानला कोटीजने बाद करत पाकला तिसरा धक्का दिला. यानंतर इफ्तिकार अहमदनेही वेगवान सुरुवात केली होती. पण तोही 31 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. त्याला शाम्सीने तंबूचा रस्ता दाखवला. कर्णधार बाबर आझमने संयमी खेळी साकारताना अर्धशतकी खेळी साकारली. पण, अर्धशतक झाल्यानंतर तो शाम्सीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 65 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 50 धावा केल्या. यावेळी पाकची 5 बाद 141 अशी स्थिती झाली होती.
सौद शकीलचे अर्धशतक अन् पाक सर्वबाद 270
कर्णधार बाबर झाल्यानंतर मात्र सौद शकील व शादाब खान यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 84 धावांची भागीदारी साकारत संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला. शकीलने 52 चेंडूत 7 चौकारासह 52 धावा केल्या तर शादाबने 36 चेंडूत 43 धावा करत त्याला चांगली साथ दिली. कोएत्झीने 40 व्या षटकात शादाब खानला (43) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली आणि पाकिस्तानचा धावगती कमी केली. यानंतर सौद शकील 43 व्या षटकांत बाद झाला. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर मात्र पाकच्या तळाच्या फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. शाहिन आफ्रिदी 2, मोहम्मद वासीम 7 तर मोहम्मद नवाजने 24 धावा केल्या. पाकिस्तानचा डाव 46.4 षटकांत 270 धावांवर संपुष्टात आला.
दक्षिण आफ्रिका संघासाठी तबरेज शम्सीने 10 षटकात 60 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स तर मार्को यान्सनने 9 षटकांमध्ये 43 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. तसेच जेराल्ड कोट्झीने 2, तर लुन्गी एनगिडीने एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान सर्वबाद 270 (बाबर आझम 50, मोहम्मद रिझवान 31, इफ्तिकार अहमद 21, सौद शकील 52, शादाब खान 43, नवाज 24, शाम्सी 60 धावांत 4 बळी, जान्सेन 3 बळी)
दक्षिण आफ्रिका 47.2 षटकांत 9 बाद 271 (बवुमा 28, डिकॉक 24, मार्करम 93 चेंडूत 91, मिलर 29, जॅन्सेन 20, केशव महाराज नाबाद 7, शम्सी नाबाद 4, शाहिन आफ्रिदी 45 धावांत 3 बळी, मीर, रौफ व वासीम प्रत्येकी दोन बळी).
यान्सेनची शेरेबाजी, रिझवानची जादू की झप्पी
आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे सलामीचे फलंदाज 7 षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतले. या दोन्ही विकेट्स वेगवान गोलंदाज मार्को यान्सनने घेतल्या. दोन विकेट पडल्यानंतर क्रीजवर आलेल्या रिझवान आणि मार्को जान्सेन यांच्यात बाचाबाची झाली, ज्यामध्ये अम्पायरला मध्यस्थी करावी लागली. पाकच्या 7 व्या षटकात मार्को यान्सेनने इमाम उल हकला झेलबाद केले. दोन निर्धाव चेंडू टाकल्यानंतर जान्सेनने सलामीवीर इमाम उल हकला बाद केले. यानंतर रिझवानने जान्सेनच्या गोलंदाजीवर थर्डमॅनच्या दिशेने चौकार वसूल केला. रिझवानच्या आक्रमक पवित्र्याने चिडलेल्या जान्सेनने त्याला उद्देशून शेरेबाजी केली. षटकातील शेवटचा चेंडू टाकल्यानंतर यान्सेन पुन्हा रिझवानच्या दिशेने गेला. त्याने पुन्हा टिप्पणी केली. रिझवानने खेळभावनेचे उदाहरण दाखवताना जान्सेनच्या दिशेने आलिंगनाची खूण केली.









