डी कॉकचे स्पर्धेतील चौथे शतक, सामनवीर डुसेनचे शतक, केशव महाराजचे 4, जॅन्सेनचे 3 बळी
वृत्तसंस्था/ पुणे
क्विन्टन डी कॉक व सामनावीर रासी व्हान डर डुसेन यांनी नोंदवलेली शानदार शतके आणि केशव महाराज व मार्को जॅन्सेन यांचा भेदक मारा यांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात न्यूझीलंडवर 190 धावांनी दणदणीत विजय मिळविला. 
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा साडेतीनशे धावांचा डोंगर उभारला. निर्धारित 50 षटकांत त्यांनी 4 बाद 357 धावा फटकावल्या. डेव्हिड मिलरनेही जलद अर्धशतक नोंदवले. त्यानंतर मोठ्या आव्हानाचे दडपण आणि द.आफ्रिकेचा भेदक मारा यांच्यासमोर न्यूझीलंडचा डाव 35.3 षटकांत 167 धावा आटोपला. विल यंग (33), डॅरील मिचेल (24) व ग्लेन फिलिप्स (50 चेंडूत 60) या तीनच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. फिलिप्सने एकाकी लढत देत नोंदवलेल्या अर्धशतकी खेळीत 4 चौकार, 4 षटकार नोंदवले. फिरकी गोलंदाज केशव महाराज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 46 धावांत 4 बळी मिळविले तर वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सेनने 31 धावांत 3, कोएत्झीने 2, रबाडाने एक बळी टिपला.
दक्षिण आफ्रिकेची पुढील लढत भारताविरुद्ध 5 नोव्हेंबर रोजी तर न्यूझीलंडची लढत पाकिस्तानशी 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
डी कॉकने 116 चेंडूत 114 धावा फटकावत या स्पर्धेतील चौथे शतक नोंदवत लंकेच्या कुमार संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली. संगकाराने 2015 मधील स्पर्धेत हा पराक्रम केला होता. एका वर्ल्ड कपमध्ये आजवर फक्त तीन फलंदाजांनी तीन किंवा त्याहून जास्त शतके नोंदवली आहेत. डी कॉकचा सहकारी व्हान डर डुसेनने आक्रमक फटकेबाजी करीत 118 चेंडूत 133 धावा झोडपल्या. याशिवाय डेव्हिड मिलरनेही अर्धशतकी खेळी करताना 30 चेंडूत 53 धावा तडकावल्या. त्याच्या खेळीत 2 चौकार, 4 षटकारांचा समावेश होता. डी कॉकने आपल्या खेळीत 10 चौकार, 3 षटकार तर व्हान डर डुसेनने 9 चौकार, 5 षटकार मारले. कर्णधार टेम्बा बवुमाने 28 चेंडूत 24 धावा काढल्या तर हेन्रिच क्लासेन 7 चेंडूत 15 व एडन मार्करम एक षटकार ठोकत 6 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडच्या टिम साऊदीने 2 ट्रेंट बोल्ट व जेम्स नीशम यांनी एकेक बळी मिळविला. अलीकडेच पॅरिसमध्ये झालेल्या रग्बी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने चौथ्यांदा जेतेपद पटकावल्याने तेथे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. येथील सामन्यात डी कॉक, डुसेन व मिलर यांनी दणकेबाज फलंदाजी करीत पुन्हा एकदा त्या सर्वांचे लक्ष क्रिकेटकडे वेधले आहे.
डी कॉक-डुसेन यांची द्विशतकी भागीदारी
न्यूझीलंडचा हंगामी कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून द.आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर बवुमा लवकर बाद झाल्यानंतर डी कॉक व डुसेन यांनी आक्रमक फटकेबाजी करीत 30 षटकांत 200 धावांची भागीदारी करीत मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. डी कॉकचा एक उंच उडालेला फटका क्षेत्ररक्षक नसलेल्या ठिकाणी पडल्याने तो सुदैवी ठरला. त्याने अधूनमधून षटकार वसूल केले तर डुसेन सहजतेने धावा जमवित होता. त्यालाही दोनदा जीवदाने मिळाली.
दोघेही पूर्ण सेट झाल्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर त्यांना रोखण्याचे मोठे आव्हान होते. याशिवाय त्यांना जखमी खेळाडूंच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. मॅट हेन्रीला धोंडशिरेची दुखापत झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यात आले तर नीशमलाही दुखापतीची समस्या आहे.
दरम्यान, डी कॉकने नीशमला षटकार ठोकतच स्पर्धेतील चौथे शतक पूर्ण केले. त्यानंतर डुसेननेही चौकार ठोकत शतक गाठले. 105 चेंडूत 104 धावा झाल्यानंतर डुसेनने धावांचा वेग वाढवत नीशमला सलग दोन षटकार ठोकले. त्यापैकी पहिल्या फटक्याला बोल्टने झेलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बोटाला लागून चेंडू सीमारेषेबाहेर पडला. नंतर डुसेनने साऊदीला लाँगऑनच्या दिशेने षटकार मारला. साऊदीने या दोघांना बाद केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात मिलरने फटकेबाजी करीत अर्धशतक नोंदवले तर क्लासेन व मार्करम यांनीही फटकेबाजी करीत संघाला साडेतीनशे पारचा टप्पा गाठून दिला.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 4 बाद 357 : डी कॉक 116 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारांसह 114, बवुमा 28 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 24, व्हान डर डुसेन 118 चेंडूत 9 चौकार, 5 षटकारांसह 133, डेव्हिड मिलर 30 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह 53, क्लासेन 7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह नाबाद 15, मार्करम 1 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 6, अवांतर 12. गोलंदाजी : साऊदी 2-77, नीशम 1-69, बोल्ट 1-49.
न्यूझीलंड 35.3 षटकांत सर्व बाद 167 : फिलिप्स 50 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांसह 60, यंग 37 चेंडूत 5 चौकारांसह 33, डॅरील मिचेल 30 चेंडूत 4 चौकारांसह 24, रचिन रवींद्र 9, अवांतर 12. गोलंदाजी : केशव महाराज 4-46, जॅन्सेन 3-31, कोएत्झी 2-41, रबाडा 1-16.









