वृत्तसंस्था / क्व्यिबेरा (द. आफ्रिका)
आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत यावेळी द. आफ्रिका संघाला अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळू शकेल, अशी आशा कर्णधार बवुमाने केली आहे. नुकत्याच झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत द. आफ्रिकेने लंकेचा 2-0 असा व्हाईटवॉश केला आहे. ही मालिका जिंकल्याने द. आफ्रिका संघाने आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
विश्व कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 च्या कसोटी कार्यक्रमातील द. आफ्रिकेचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. द. आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार असून या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरला सुरू होणार आहे.
लंकेविरुद्धच्या मालिकेत द. आफ्रिका संघातील खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केल्याबद्दल कर्णधार बवूमाने समाधान व्यक्त केले आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रामुख्याने द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चुरस आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना पुढील वर्षी लंडनमध्ये खेळविला जाणार आहे.









