वृत्तसंस्था/कोलंबो
श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका आज शुक्रवारी येथे होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात आमनेसामने येत असताना कोलंबोमधील पावसाचे सावट दूर होईल, अशी आशा करतील. आर. प्रेमदासा स्टेडियमवरील शेवटचे दोन सामने वाया गेले आहेत आणि शुक्रवारीही पाऊस आणि वादळाचा अंदाज आहे. जर सामना झाला, तर श्रीलंकेला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवायच्या आहेत. पावसामुळे रद्द झालेल्या दोन सामन्यांमधून त्यांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे आणि चार सामन्यांनंतर गुणतालिकेत ते अंतिम स्थानावर आहेत. बुधवारी येथे न्यूझीलंडविऊद्ध त्यांनी दमदार फलंदाजी केली, ज्यामध्ये कर्णधार चमारी अटापटूचे अर्धशतक आणि हवामानाने खेळ खराब करण्यापूर्वी निलाक्षिका सिल्वाचे चालू स्पर्धेतील सर्वांत जलद अर्धशतक यांचा समावेश होता.
दक्षिण आफ्रिकेविऊद्ध लंकेला या प्रयत्नांवर भर द्यावा लागेल. कारण त्या संघाने भारत आणि बांगलादेशविऊद्धचे दोन चुरशीचे सामने जिंकण्यात यश मिळविलेले आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडविऊद्ध 10 गड्यांनी पराभूत व्हावे लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड, यजमान भारत आणि त्यानंतर बांगलादेशविऊद्ध लक्ष्याचा पाठलाग करून नाटकीय पद्धतीने चित्र बदलले आहे. भारत आणि बांगलादेशविऊद्ध अडचणीत सापडलेल्यावेळी दक्षिण आफ्रिकेने यशस्वीरीत्या पाठलाग करताना प्रशंसनीय झुंज दिली आणि धाडस दाखवले. त्या दोन्ही सामन्यांमध्ये नॅडिन डी क्लर्क ही एक उठून दिसलेली खेळाडू होती, जिने अत्यंत दबावाखाली काम पूर्ण करण्यासाठी उल्लेखनीय संयम दाखविला.
तथापि, दक्षिण आफ्रिकेला आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही आणि कर्णधार लॉरा वोल्व्हार्टच्या नेतृत्वाखालील वरच्या फळीकडून त्यांना धावांची अपेक्षा असेल. ‘वरच्या फळीचे योगदान हवे तसे नाही. पण किमान आम्ही विजय मिळवत आहोत. मला वाटते की, भूतकाळात अशा मालिका आणि सामने झाले आहेत जिथे आम्ही अशा प्रकारच्या लढतींत पराभूत झालेलो आहोत. म्हणून मला वाटते की, आम्ही आता जिंकत आहोत आणि खालच्या फळीतील खेळाडू खरोखरच खूप धावा करत आहेत, ही चांगली बाब आहे. मला खात्री आहे की, हा असा एक सामना असेल जिथे आमची वरची फळी चांगली खेळेल. आम्ही फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आत्मविश्वास बाळगला पाहिजे, असे लॉराने म्हटले आहे.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.









