हैदराबाद)/ वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविऊद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी निवडलेले दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएल प्लेऑफला मुकण्याची शक्यता आहे. कारण त्या देशाचे क्रिकेट मंडळ लीगपेक्षा राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देण्यावर ठाम आहे.
बीसीसीआयने सोमवारी पुष्टी केली की, आयपीएल 17 मे रोजी पुन्हा सुरू होईल आणि अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे. तथापि, सुधारित वेळापत्रकामुळे डब्ल्यूटीसी फायनलमध्ये खेळणार असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू अडचणीत आले आहेत. आयपीएलमधील संघांनी आणि बीसीसीआयने परदेशी मंडळांना स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांसाठी त्यांचे खेळाडू उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.
तथापि, दक्षिण आफ्रिकी क्रिकेट मंडळाने डब्ल्यूटीसी फायनलच्या तयारीला असलेले महत्त्व पुन्हा बोलून दाखविले आहे. ‘परत येणे किंवा खेळणे किंवा (आयपीएलमध्ये खेळणे) कायम ठेवणे हा वैयक्तिक निर्णय आहे, असे त्यांचे राष्ट्रीय संघ व उच्च कामगिरी संचालक एनोच एनक्वे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘आम्ही एक गोष्ट स्पष्ट केली आहे आणि आम्ही आयपीएल व बीसीसीआयसोबत चर्चा करून त्याला अंतिम रूप देत आहोत. ही बाब म्हणजे डब्ल्यूटीसी तयारीच्या बाबतीत आमच्या मूळ योजनेवर ठाम राहणे’, असे त्यांनी म्हटले आहे.
26 मे ही कसोटी खेळाडूंसाठी परतण्याची शेवटची तारीख आहे. मूळ योजना बदलणार नाहीत. कारण सर्वांत जास्त प्राधान्य जागतिक कसोटी स्पर्धेच्या फायनलला आहे. आम्ही खात्री करून घेण्यासाठी गेल्या एक-दोन दिवसांपासून त्यांच्याशी संवाद साधत आहोत, असे एनक्वे पुढे म्हणालो. 11 जूनपासून लंडनमध्ये सुरू होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनलसाठी दक्षिण आफ्रिका संघात कागिसो रबाडा (गुजरात टायटन्स), लुंगी एनगिडी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर), ट्रिस्टन स्टब्स (दिल्ली कॅपिटल्स), एडन मार्करम (लखनौ सुपर जायंट्स), रायन रिकल्टन (मुंबई इंडियन्स), कॉर्बिन बॉश (मुंबई इंडियन्स), मार्को जॅनसेन (पंजाब किंग्स) आणि वियान मुल्डर (सनरायझर्स हैदराबाद) या 8 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
सध्या गुजरात, आरसीबी, मुंबई, पंजाब, दिल्ली व लखनौ हे आयपीएल प्लेऑफसाठी शर्यतीत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी मंडळाच्या भूमिकेची री ओढली आहे. ‘आयपीएल-बीसीसीआयसोबतच्या आमच्या सुऊवातीच्या करारानुसार अंतिम सामना 25 तारखेला होणार होता आणि आमचे खेळाडू 26 तारखेला परतणार होते. जेणेकरून त्यांना 30 तारखेला उ•ाण करण्यापूर्वी पुरेसा वेळ मिळाला असता. सध्या तरी आम्ही हे पुढे ढकलत नाही आहोत. आम्हाला आमचे खेळाडू 26 तारखेला परत हवे आहेत’, असे त्यांनी सांगितले.
आयपीएलच्या नवीन वेळापत्रकानुसार, साखळी टप्पा 27 मे रोजी संपेल, 29 मे ते 3 जूनदरम्यान प्लेऑफचे सामने खेळवण्यात येतील. त्यामुळे जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तयारीवर परिणाम होणार आहे. दक्षिण आफ्रिकी क्रिकेट मंडळाने याबाबतीत कडक भूमिका घेतली आहे, तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंना व्यक्तिश: निर्णय घेण्यास परवानगी दिली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ त्यांच्या ना हरकत दाखल्यांचे पुनरावलोकन करणार आहे.









