वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत 24 तासात मोठा उलटफेर
वृत्तसंस्था/ दुबई
ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतमध्ये मोठा बदल झाला होता. पहिल्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियाला तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले होते. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले होते, मात्र आता तब्बल 24 तासानंतर पुन्हा एकदा फेरबदल झाला आहे. अवघ्या एका दिवसानंतर ऑस्ट्रेलियाला आपले अव्वल स्थान सोडावे लागले असून श्रीलंकेवरील एकतर्फी विजयासह दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. अर्थात, आफ्रिकेचा हा मालिकाविजय भारतासाठी मात्र धक्कादायक ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली. यासह ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या खूप जवळ आले आहेत. आफ्रिकन संघ अव्वल स्थानावर पोहोचल्यामुळे टीम इंडिया व ऑस्ट्रेलियाला मात्र मोठा फटका बसला आहे. सध्याच्या घडीला, आफ्रिकेच्या गुणांची टक्केवारी सर्वाधिक 63.33 आहे. ऑस्ट्रेलियाचे 60.71 टक्के गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. भारताच्या गुणांची टक्केवारी 57.29 असून संघ तिसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत आता या तीन संघांमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी स्पर्धा आहे.
फायनलसाठी भारताचा मार्ग खडतर, कांगारुंना संधी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पोहोचणे भारतासाठी दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत विजय मिळवत भारताने दणक्यात सुरुवात केली होती पण दुसऱ्या सामन्यात हार पत्कारावी लागल्यामुळे गुणतालिकेचे समीकरण पूर्ण बदलले आहे. आता भारतीय संघाची थेट लढत ऑस्ट्रेलियाशी आहे. टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तरच त्यांच्याकडे अंतिम फेरीत जाण्याची आशा असेल. अॅडलेड कसोटीत भारताचा ज्या प्रकारे पराभव झाला, ते पाहता संघाला पुनरागमन करणे सोपे जाणार नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठायची असेल तर टीम इंडियाला उर्वरित तीन सामने जिंकण्याशिवाय पर्याय असणार नाही. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध आणखी तीन सामने खेळायचे आहेत. याशिवाय, ते श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. भारताविरुद्ध निकाल काही लागला तर ऑस्ट्रेलियाला लंकेविरुद्ध आणखी एक संधी मिळेल. पण टीम इंडियाकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकण्याची कोणताही पर्याय असणार नाही.
आफ्रिकन संघाची कमाल
दक्षिण आफ्रिकेला मायदेशात पाकिस्तानविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. आफ्रिकेने या दोन कसोटींपैकी एक जरी कसोटी जिंकली, तर ते फायनलसाठी थेट पात्र ठरतील. मात्र या मालिकेत त्यांचा पराभव झाला, तरी ते स्पर्धेतून बाहेर होणार नाहीत. याशिवाय, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेच्या निकालावर इतर संघांचं भविष्य अवलंबून असेल. टीम इंडियाला जर पुढे जायचं असेल, तर त्यांना श्रीलंकेने या मालिकेत किमान एक सामना अनिर्णित ठेवावा किंवा जिंकावा, अशी प्रार्थना करावी लागेल.









