तिरंगी टी-20 मालिका, रुबीन हर्मन सामनावीर
वृत्तसंस्था/ हरारे
तिरंगी टी-20 मालिकेतील येथे रविवारी खेळविण्यात आलेल्या चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान झिंबाब्वेचा 16 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या रुबीन हर्मनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून झिंबाब्वेला प्रथम फलंदाजी दिली. झिंबाब्वेने 20 षटकात 6 बाद 144 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 17.2 षटकात 3 बाद 145 धावा जमवित विजय नोंदविला.
झिंबाब्वेच्या डावामध्ये बेनेटने 43 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 61, ब्युरेलने 31 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 36, मधवेरेने 14 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे बॉश्चने 2 तर एन्गिडी, पिटर आणि बर्जर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. झिंबाब्वेच्या डावात 5 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. झिंबाब्वेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 29 धावा जमविता 2 गडी गमाविले. बेनेटने 38 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक नोंदविले. बेनेट आणि ब्यूरेल यांनी चौथ्या गड्यासाठी 78 धावांची भागिदारी केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेचे पहिले 2 फलंदाज केवळ 22 धावांत बाद झाले. मापोसाने प्रेटोरियसला केवळ 4 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर मापोसाने दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना हेंड्रीक्सला 6 धावांवर तंबूचा रस्ता दाखविला. कर्णधार व्हॅन डेर ड्यूसेन आणि रुबीन हर्मन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 11.2 षटकात 106 धावांची शतकी भागीदारी केली. ड्युसेनने 41 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 52 तर हर्मनने 36 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 63 धावा झोडपल्या. ब्रेव्हिसने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 13 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 5 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. झिंबाब्वेतर्फे मापोसाने 38 धावांत 2 तर निगरेव्हाने 21 धावांत 1 गडी बाद केला. हर्मनने 29 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह तर व्हॅन डेर ड्यूसेनने 40 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक नोंदविले. दक्षिण आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 33 धावा जमविताना 2 गडी गमाविले.
संक्षिप्त धावफलक – झिंबाब्वे 20 षटकात 6 बाद 144 (बेनेट 61, ब्यूरेल नाबाद 36, मधवेरे 13, बॉश 2-16, एन्गिडी, बर्जर व पिटर प्रत्येकी 1 बळी), दक्षिण आफ्रिका 17.2 षटकात 3 बाद 145 (हर्मन 63, व्हॅन डेर ड्यूसेन नाबाद 52, ब्रेव्हिस नाबाद 13, मापोसा 2-38, निगरेव्हा 1-21).









