इंग्लंडमध्ये आफ्रिकेची ऐतिहासिक कामगिरी : दुसऱ्या वनडेत इंग्लंड 5 धावांनी पराभूत : मॅथ्यू ब्रिट्झची 85 धावांची खेळी
वृत्तसंस्था/ लंडन
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान इंग्लंडवर 5 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, 27 वर्षानंतर आफ्रिकेने इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. गुरुवारी लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आफ्रिकेने 8 गडी गमावून 330 धावा केल्या. 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 9 गडी गमावून फक्त 325 धावा करता आल्या आणि त्यांना 5 धावांनी पराभव पत्करावा लागला.
प्रारंभी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेला एडन मार्करम आणि रिकेल्टन या दोघांनी चांगली सुरुवात करुन दिली. मार्करमने 49 तर रिकेल्टनने 35 धावांचे योगदान दिले. कर्णधार टेंबा बवुमा मात्र या सामन्यात अपयशी ठरला. त्याला 4 धावांवर आदिल रशीदने बाद केले. यानंतर मॅथ्यू ब्रीट्झके आणि ट्रिस्टन स्टब्ज या जोडीने चौथ्या विकेटसाठी 147 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. ब्रीट्झकेने 77 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारासह सर्वाधिक 85 धावांची खेळी साकारली तर स्टब्जने 58 धावांची खेळी करत त्याला मोलाची साथ दिली. याशिवाय, डेवॉल्ड ब्रेविसने 20 चेंडूत 42 तर कॉर्बिन बॉशने 32 धावांची खेळी करत आफ्रिकेला त्रिशतकी मजल मारुन दिली. दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून 330 धावा केल्या आणि इंग्लंडला 331 धावांचे लक्ष्य दिले. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 4, आदिल रशीदने 2 आणि जेकब बेथेलने 1 बळी घेतला.
इंग्लंडकडूनही विजयासाठी संघर्ष
इंग्लंडनेही विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना तीन अर्धशतके झळकावली. तथापि, संघाला फक्त 5 धावांनी सामना गमवावा लागला. जो रुट आणि जोस बटलरने सर्वाधिक 61 धावांची खेळी साकारली. याशिवाय, जेकेब बेथेलने 58 धावांची खेळी साकारली. कर्णधार हॅरी ब्रूकने 33 तर विल जॅक्सने 39 धावांचे योगदान दिले. धावांचा पाठलाग करताना इंग्लिश फलंदाजांनी चांगली झुंज दिली पण शेवटी त्यांना 50 षटकांत 9 बाद 325 धावापर्यंतच मजल मारता आली. शेवटी आफ्रिकेने बाजी मारताना हा सामना 5 धावांनी जिंकला. आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने 3 आणि केशव महाराजने 2 बळी घेतले. लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश आणि मुथुसामी यांनी 1-1 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 8 बाद 330 (मार्करम 49, रिकेल्टन 35, ब्रिट्झेके 85, स्टब्ज 58, ब्रेविस 42, जोफ्रा आर्चर 4 बळी)
इंग्लंड 50 षटकांत 9 बाद 325 (जो रुट 61, जोस बटलर 61, विल जॅक्स 39, जोफ्रा आर्चर नाबाद 27, हॅरी ब्रूक 33, नांद्रे बर्गर 3 बळी, केशव महाराज 2 बळी).
आफ्रिकेची ऐतिहासिक कामगिरी
गेल्या 27 वर्षांपासून आफ्रिकेने इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला पराभूत करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले, पण असे होऊ शकले नव्हते. 2025 मध्ये तेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली खेळताना दक्षिण आफ्रिकेने हा पराक्रम करून दाखवला आहे. याआधी, आफ्रिकेने 1998 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना शेवटची एकदिवसीय मालिका जिंकली होती. तेव्हापासून, आफ्रिकन संघाने इंग्लंडमध्ये दोन मालिका गमावल्या आहेत. तर दोन मालिका अनिर्णित राहिल्या होत्या. 2012 आणि 2022 ची मालिका अनिर्णित राहिली असली तरी, इंग्लंडने 2017 मधील मालिका जिंकली होती. त्यामुळे दोन्ही अनिर्णित सामन्यांमध्ये ट्रॉफी इंग्लंडकडेच कायम राहिली.









