क्लो ट्रायॉन सामनावीर, दीप्ती शर्मा मालिकावीर

वृत्तसंस्था /ईस्ट लंडन
गुरुवारी येथे झालेल्या महिलांच्या तिरंगी टी-20 मालिकेचे अजिंक्यपद यजमान दक्षिण आफ्रिकेने पटकाविले. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकवणारी दक्षिण आफ्रिकेच्या क्लो ट्रायॉनला ‘सामनावीर’ तर भारताच्या दीप्ती शर्माला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेटपटूंची खराब फलंदाजी पहावयास मिळाली.
हा सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा होती. पण भारताच्या खराब फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना 2 षटके बाकी ठेऊन आरामात जिंकला.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 109 धावा जमवित दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 110 धावांचे सोपे आव्हान दिले. दक्षिण आफ्रिकेने 18 षटकात 5 बाद 113 धावा जमवित सामना आणि स्पर्धा जिंकली

भारताच्या डावामध्ये हरलीन देओलने एकाकी लढत देताना 56 चेंडूत 4 चौकारांसह 46 धावा जमविल्या. सलामीची फलंदाज स्मृती मानधना पुन्हा फलंदाजी सुर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले. दक्षिण आफ्रिकेच्या मलाबाने मानधनाला खाते उघडण्यापूर्वीच डावातील दुसऱया षटकात त्रिफळाचीत केले. रॉड्रिग्ज आणि देओल यांनी दुसऱया गडय़ासाठी 20 धावांची भर घातली. मलाबाने रॉड्रिग्जला यष्टीचीत केले. तिने 18 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. देओल आणि कर्णधार हरमनप्रित कौर या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 48 धावांची भागिदारी केली. लूसने कौरला यष्टीचीत केले. कौरने 22 चेंडूत 2 चौकारांसह 21 धावा जमविल्या. खाकाने देओलचा शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्रिफळा उडविला. देओलने 56 चेंडूत 4 चौकारांसह 46 धावा जमविल्या. कौरने दीप्ती शर्मासमवेत चौथ्या गडय़ासाठी 39 धावांची भर घातली. दीप्ती शर्माने 1 चौकारासह नाबाद 16 धावा जमविल्या. वस्त्रकार एका धावेवर नाबाद राहिली. भारताच्या डावात 9 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे मलाबाने 2 तर लूस आणि खाका यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
या खेळपट्टीवर चेंडू खाली रहात असल्याने फलंदाजांना फटके मारताना अवघड जात होते. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचे 3 फलंदाज 21 धावात बाद केले. दीप्ती शर्माने सलामीच्या वुलव्हर्टला खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचीत केले. त्यानंतर स्नेह राणाने ब्रिट्सला झेलबाद केले. तिने 1 षटकारासह 8 धावा जमविल्या. राजेश्वरी गायकवाडने सातव्या षटकात गुडॉलचा त्रिफळा उडविला. तिने 7 धावा जमविल्या. कर्णधार लूस रेणुकासिंग ठाकुरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. स्नेह राणाने आपल्याच गोलंदाजीवर ऍनेरी डर्कसनला टिपले. तिने 1 चौकारासह 8 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेची यावेळी स्थिती 13.1 षटकात 5 बाद 66 अशी होती. क्लो ट्रायॉन आणि डी क्लर्क यांनी सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 47 धावांची भागिदारी करुन आपल्या संघाला 2 षटके बाकी ठेऊन विजय मिळवून दिला. ट्रायॉनने 32 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 57 तर डी क्लर्कने 17 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 17 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 3 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे स्नेह राणाने 2 तर दीप्ती शर्मा, गायकवाड आणि रेणुकासिंग ठाकूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेत 10 फेब्रुवारीपासून महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरु होणार आहे. त्यात बलाढय़ संघांचा सहभाग असल्याने भारतीय महिला संघाला दर्जेदार कामगिरी करावी लागेल. या तिरंगी मालिकेतून त्यांची विशेष तयारी झाली नसल्याचे दिसून आले.
संक्षिप्त धावफलक
भारत : 20 षटकात 4 बाद 109 (मानधना 0, रॉड्रिग्ज 11, देओल 46, हरमनप्रित कौर 21, दीप्ती शर्मा नाबाद 16, वस्त्रकार नाबाद 1, अवांतर 14, मलाबा 2-16, खाका 1-17, लूस 1-22), दक्षिण आफ्रिका : 18 षटकात 5 बाद 113 (वुलव्हर्ट 0, ब्रिट्स 8, गुडॉल 7, लूस 12, ट्रायॉन नाबाद 57, डर्कसन 8, डी क्लर्क नाबाद 17, अवांतर 4, स्नेह राणा 2-21, दीप्ती शर्मा 1-19, गायकवाड 1-25, रेणुकासिंग 1-16).









