वृत्तसंस्था/ धर्मशाला
दक्षिण आफ्रिका संघाने विश्वचषकात छाप उमटविताना आतापर्यंत मनोरंजक खेळ करत मोठ्या प्रमाणात धावा लुटल्या आहेत आणि प्रतिस्पर्धी संघांवर निर्विवाद वर्चस्व गाजविलेले आहे. स्पर्धेत बरीच पुढे मजल मारण्याचा निर्धार त्यांनी दाखविलेला असून मंगळवारी येथे होणार असलेल्या नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्यांचे पारडे भरपूर जड राहील हे स्पष्ट आहे.
नवी दिल्लीतील सलामीच्या लढतीत श्रीलंकेविऊद्ध 102 धावांनी विजय मिळविताना त्यांनी 5 बाद 428 अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यानंतर लखनौमध्ये पाच वेळचे विजेते ऑस्ट्रेलियाविऊद्ध 134 धावांनी दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका हा पराभूत करण्यास कठीण संघ म्हणून स्पर्धेत उभरला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची कामगिरी आतापर्यंत अपेक्षांना जागू शकलेली नाही. याच्या विपरित दक्षिण आफ्रिकेने आपली लढाऊ आणि आक्रमक क्षमता पुरेपूर दाखवून दिलेली असून यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक, सलामवीर रॅसी व्हॅन डर डुसेन आणि एडन मार्करम यांनी मोठा प्रभाव पाडलेला आहे.
वरील तिघांनी श्रीलंकेविऊद्ध प्रत्येकी एक शतक झळकावले. शिवाय हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनीही उपयुक्त योगदान दिले. जरी त्या सामन्यात त्यांच्या गोलंदाजांना चमक दाखविता आली नसली, तरी पुढच्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाविऊद्ध पूर्ण ताकदीने मारा केला. डी कॉकचे सलग दुसरे शतक आणि वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन आणि रबाडा यांनी पॅट कमिन्सच्या संघाला पुरेपूर आडवे केले.
दक्षिण आफ्रिका नेदरलँड्सविऊद्ध आणखी ताकदीने आक्रमण करण्याचा विचार करेल. नेदरलँड्सचा संघ हा फारसा ताकदवान नसून अधूनमधून त्यांनी धक्के दिलेले आहेत. 2009 च्या टी20 विश्वचषकादरम्यान लॉर्ड्सवर त्यांनी इंग्लंडला हरवून दाखविले होते, तर गेल्या वर्षी डच संघासमोर ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकाच्या ‘सुपर 12’ टप्प्यात दक्षिण आफ्रिकेला 13 धावांनी धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. ‘टी20’पेक्षा एकदिवसीय सामने हे खूप वेगळे असले, तरी स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील डच संघ त्या विजयापासून नक्कीच प्रेरणा घेईल. त्यातच नवी दिल्लीत रविवारी रात्री अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून दाखविल्याचे पाहून नेदरलँड्सच्या मनातही त्यांचा कित्ता गिरविण्याची इच्छा जागृत होऊ शकते.
संघ : नेदरलँड्स-स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, वेस्ली बॅरेसी, बास डी लीडे, आर्यन दत्त, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रायन क्लेन, तेजा निदामनुऊ, मॅक्स ओ’डॉड, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, लोगन व्हॅन बीक, रोएलऑफ व्हॅन डर मर्वे, पॉल व्हॅन मीकरेन, विक्रमजित सिंग.
दक्षिण आफ्रिका-टेम्बा बवुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, व्हॅन डर डुसेन, लिझाद विल्यम्स.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









