लॉर्ड्सवर रंगणार जेतेपदासाठी चुरस
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीचे गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरनंतर प्रथमच दक्षिण आफ्रिका संघात पुनरागमन झाले आहे. द.आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीसाठी 15 सदस्यीय संघाची मंगळवारी घोषणा केली. 11 जूनपासून लॉर्ड्स मैदानावर ही लढत होणार आहे.
उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेला कागिसो रबाडाने एक महिन्याच्या निलंबनानंतर अलीकडे पुनरागमन केले. या अंतिम लढतीसाठी निवडलेल्या कसोटी संघातील तो सहापैकी एक वेगवान गोलंदाज आहे. याशिवाय केशव महाराज व सेनुरन मुथुसामी यांच्या रूपात दोन स्पिनर्सही या संघात आहे. त्यांच्या गोलंदाजी आक्रमणात गोलंदाज अष्टपैलूंनाही स्थान देण्यात आले आहे. मार्को जान्सेन, विआन मुल्डर व कॉर्बिन बॉश हे तीन अष्टपैलू आहेत. टेम्बा बवुमाकडे या कसोटी संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.
आघाडी फळीत मजबूत भावना व एकंदर समतोल आहे. आघाडी फळीत मार्करम, टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम हे खेळाडू आहेत तर दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरी गाठण्यास मदत करणारया प्रमुख खेळाडूंपैकी एक काईल व्हेरेनची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे,’ असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने एका पत्रकात म्हटले आहे. गेल्या 18 महिन्यात आम्ही स्पर्धात्मक कसोटी युनिट तयार करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत आणि ही कामगिरी त्या प्रगतीचे प्रतिबिंब आहे,’ असे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड म्हणाले. आमच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग निवडीतील सातत्य आहे आणि आम्ही या डब्ल्यूटी सायकलचा भाग असलेल्या मुख्य गटाशी जोडललो आहोत, लॉर्ड्सवर आम्हाला अपेक्षित असलेल्या परिस्थितीसाठी आम्ही एक संतुलित संघ निवडला आहे, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने म्हटले आहे. द.आफ्रिका संघ 31 मे रोजी अरुंडेलमध्ये एकत्र येईल आणि 3 ते 6 जून या कालावधीत एक सराव सामना झिम्बाव्वेविरुद्ध खेळणार आहे.
डब्ल्यूटीसी फायनल कसोटीसाठी निवडलेला द.आफ्रिका संघ : टेम्बा बवुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, कॉर्बिन बॉश, टोनी डी झोर्झी, मार्को जान्सेन, केशव महाराज, एडन मार्करम, विआन मुल्डर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एन्गिडी, डेन पॅटर्सन, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, काईल व्हेरेन.
.









