यजमानांपुढे विजय मिळवून कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्याचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
दक्षिण आफ्रिकेची पाकिस्तानविरुद्धची पहिली कसोटी आज गुऊवारपासून येथे सुरू होत असून त्यात पूर्ण वेगवाना मारा वापरून ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्याकडे यजमानांचे लक्ष असेल. पुढील वर्षी लॉर्ड्सवर होणाऱ्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला उर्वरित दोन कसोटी सामन्यांपैकी एक जिंकणे आवश्यक आहे आणि कर्णधार टेम्बा बावुमा याच्या मते दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी करून दाखविण्यासंदर्भात सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
त्या अपेक्षांसह दबाव येईल. परंतु प्रामाणिकपणे सांगायचे, तर आम्ही मालिका 2-0 ने जिंकण्यासाठी उतरत आहोत, असे बावुमाने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेने चार वेगवान गोलंदाजांना खेळविण्याचे ठरविले असून त्यात कॉर्बिन बॉशला समाविष्ट केले आहे. बॉश हा सातत्याने ताशी 140 किलोमीटरांपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करतो आणि तो त्याची पहिली कसोटी खेळणार आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि मार्को जॅनसेन हे डेन पॅटरसन आणि बॉश यांच्यासोबत मिळून पाकिस्तानच्या फलंदाजांसमोर सेंच्युरियन खेळपट्टीवर खडतर आव्हान उभे करतील.
या ठिकाणी वेगवान गोलंदाजांना गेल्या सहा वर्षांत स्पष्टपणे फायदा मिळालेला आहे. फिरकी गोलंदाजांनी केवळ 16 फलंदाजांना बाद केलेले असताना वेगवान गोलंदाजांनी 227 बळी घेतलेले आहेत. याआधी पाकिस्तानविऊद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला 3-0 अशा दुर्मिळ व्हाईटवॉशला सामोरे जावे लागलेले आहे. त्यात टोनी डी झॉर्झी, रायन रिकेल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स हे तिघे सलामीच्या सामन्यात सलमान अली आगाच्या ऑफस्पिन गोलंदाजीला पारखण्यात अपयशी ठरले.
पण दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तान दीर्घकाळापासून संघर्ष करत आलेला आहे. त्यांनी 1995 साली पहिल्यांदा या देशाचा दौरा केल्यापासून 12 कसोटी सामने गमावले आहेत आणि 15 पैकी फक्त दोनच सामने जिंकलेले आहेत. पाकिस्तानच्या दक्षिण आफ्रिकेतील अत्यंत खराब कामगिरीमध्ये त्यांच्या कसोटीतील सर्वांत कमी 49 धावसंख्येचा समावेश आहे. 2013 मध्ये हा नीचांक त्यांच्याकडून नोंदला गेला होता.









