वृत्तसंस्था/ पुणे
विश्वचषकातील आज बुधवारी येथे होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येतील. मागील सामन्यात एका बाजूने दक्षिण आफ्रिकेने चेन्नईमध्ये पाकिस्तानविऊद्ध एक गडी राखून निसटता विजय मिळवला, तर न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाविऊद्ध 388 धावांचा पाठलाग करताना केवळ पाच धावा अपुऱ्या पडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के करण्यासाठी दोन्ही संघ दृढपणे लढत असल्याने आज चुरसपूर्ण सामन्याची अपेक्षा केली जाऊ शकते
न्यूझीलंडसाठी (6 सामन्यांतून 8 गुण) चार सलग विजयांनंतर धर्मशाला येथील टप्पा अपेक्षेनुसार राहिलेला नाही आणि त्यांना आणखी एक पराभव स्वीकारावा लागल्यास अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवित होण्यास मदत होईल. दुसरीकडे, जर दक्षिण आफ्रिकेने (6 सामन्यांतून 10 गुण) सामना जिंकला, तर त्यांचे 12 गुण होऊन भारताबरोबरच शेवटच्या चार संघांत पोहोचणे निश्चित होईल.
दोन्ही संघांनी बहुतांश सामन्यांमध्ये प्रभावी फलंदाजी केली आहे. परंतु गाहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावरील खेळपट्टी फिरकीस अनुकूल राहण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक (431 धावा) आतापर्यंत तीन शतकांसह फॉर्मात आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या तऊण रचिन रवींद्रने (406 धावा) प्रभावी फटकेबाजी केलेली आहे. जर हेन्रिक क्लासेन (300 धावा) हा दक्षिण आफ्रिकेसाठी ‘पॉवर हिटर’ तथा ‘फिनिशर’ असेल, तर न्यूझीलंडकडेही जिमी नीशमच्या रुपाने तसा खेळाडू उपलब्ध आहे.
डेव्हिड मिलर हा दक्षिण आफ्रिकेसाठी ‘एक्स-फॅक्टर’ असला, तरी न्यूझीलंडकडेही डॅरिल मिशेलसारखा (322 धावा) फलंदाज आहे. त्याचप्रमाणे एडेन मार्करमच्या कौशल्याचा सामना ग्लेन फिलिप्सच्या प्रतिभेने केला जाऊ शकतो. कारण दोघेही फिरकी गोलंदाजीचा प्रभावीपणे सामना करू शकतात. फलंदाजीतील साम्य येथेच संपत नाही. दोन्ही कर्णधारांची फलंदाजीची शैलीही सारखीच आहे. जखमी केन विल्यमसनच्या जागी कर्णधारपद सांभाळणारा टॉम लॅथम आणि दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा हे एकदा स्थिरस्थावर झाले की, प्रतिस्पर्ध्यांना जड जाऊ शकतात.
दक्षिण आफ्रिकेला वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा चेन्नईतील पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावल्यानंतर या सामन्यासाठी तंदुऊस्त होण्याची अपेक्षा असेल. रबाडाची उपस्थिती गेराल्ड कोएत्झी आणि मार्को जॅनसेन यासारख्या तऊण गोलंदाजांना नक्कीच मदतकारी ठरते. फिरकी गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेकडे केशव महाराज आणि तबरेझ शम्सी आहेत, तर न्यूझीलंडकडे मिचेल सँटनर आहे. त्याशिवाय फिलिप्सनेही चांगली गोलंदाजी केलेली असून ईश सोधी हा त्यांच्याकडे उपलब्ध असलेला आणखी एक फिरकी पर्याय आहे.
संघ : दक्षिण आफ्रिका-टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेन्रिक क्लासेन, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डुसेन आणि लिझाद विल्यम्स.
न्यूझीलंड-केन विल्यमसन (कर्णधार-खेळणार नाही), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (हंगामी कर्णधार), डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी आणि विल यंग.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









