मुल्डेरचे नाबाद त्रिशतक : झिंबाब्वेला 170 धावांत गुंडाळले
वृत्तसंस्था/ बुलावायो
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून यजमान झिंबाब्वेला फॉलोऑन स्वीकारावा लागला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिला डाव 5 बाद 626 धावांवर घोषित केल्यानंतर झिंबाब्वेचा पहिला डाव केवळ 170 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात कर्णधार मुल्डेरने नाबाद त्रिशतक (367) झळकाविताना 4 षटकार आणि 49 चौकार ठोकले.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी झिंबाब्वेची गोलंदाजी झोडपून काढली. खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 465 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन त्यांनी सोमवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. कर्णधार मुल्डेरने बेडिंगहॅम समवेत तिसऱ्या गड्यासाठी 184 धावांची भागिदारी केली. बेडिंगहॅमने 101 चेंडूत 7 चौकारांसह 82 धावा जमविल्या. बेडिंगहॅम बाद झाल्यानंतर प्रेटोरियसने मुल्डेरला चांगलीच साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 217 धावांची द्विशतकी भागिदारी केली. प्रेटोरियसने 87 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 78 धावा जमविल्या.
मुल्डेरचे त्रिशतक
264 धावांवर नाबाद राहणाऱ्या कर्णधार मुल्डेरने सोमवारी आपले त्रिशतक पूर्ण केले. त्याने 297 चेंडूत 3 षटकार आणि 38 चौकारांसह त्रिशतक नोंदविले. ब्रेव्हिस समवेत त्याने पाचव्या गड्यासाठी 88 धावांची भर घातली. ब्रेव्हिसने 35 चेंडूत 4 चौकारांसह 30 धावा केल्या. उपहारापर्यंत दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 626 धावा जमवित डावाची घोषणा केली. मुल्डेर आणि व्हेरेनी यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य 113 धावांची भागिदारी केली. व्हेरेनीने 62 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 42 धावा झळकाविल्या. कसोटी क्रिकेटमध्ये मुल्डेरची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. झिंबाब्वेतर्फे चिवंगाने 2 तर माटीगेमूने 2 तसेच वेलिंग्टन मात्साकेझाने 1 गडी बाद केला.
उपाहारानंतर झिंबाब्वेच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली. पण दक्षिण आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 170 धावांत आटोपला. झिंबाब्वेच्या पहिल्या डावात सिन विलियम्सने एकाकी लढत देत 55 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 83 धावा जमविल्या. मधवेरेने 2 चौकारांसह 25, वेल्चने 1 चौकारासह 10, कर्णधार इर्व्हिनने 2 चौकारांसह 17 तर टिगाने 1 चौकारासह 12 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे पी. सुब्राएनने 42 धावांत 4 तर मुल्डेर आणि यूसूफ यांनी प्रत्येकी 2 गडी तसेच बॉश्च आणि मुत्थुसॅमी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. झिंबाब्वेचा संघ 456 धावांनी पिछाडीवर असल्याने दक्षिण आफ्रिकेने त्यांच्यावर फॉलोऑन लादला. झिंबाब्वेने दिवसअखेर दुसऱ्या डावात 16 षटकात 1 बाद 51 धावा जमविल्या. कैतानो 5 चौकारांसह 34 तर वेल्च 6 धावांवर खेळत आहेत. मेयर्स 2 चौकारांसह 11 धावांवर बाद झाला. झिंबाब्वेचा संघ अद्याप 405 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 9 गडी खेळावयाचे आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना एकतर्फी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकल्याने आता ते झिंबाब्वेचा व्हाईटवॉश करण्याच्या तयारीत आहेत.
संक्षिप्त धावफलक – द. आफ्रिका प. डाव 5 बाद 626 डाव घोषित (मुल्डेर नाबाद 367, बेडिंगहॅम 82, प्रेटोरियस 78, ब्रेव्हिस 30, व्हेरेनी नाबाद 42 अवांतर 14, चिवांगा आणि मेटीगिमू प्रत्येकी 2 बळी), झिंबाब्वे प. डाव सर्वबाद 170 (विलियम्स नाबाद 83, मधवेरे 25, इर्व्हिन 17, इगा 12, वेल्च 10, सुब्रायल 4-42, युसूफ आणि मुल्डेर प्रत्येकी 2 बळी, बॉश आणि मुथुसॅमी प्रत्येकी 1 बळी), झिंबाब्वे दु. डाव 16 षटकात 1 बाद 51 (कैतानो खेळत आहे 34, मेयर्स 11, वेल्च खेळत आहे 6).









