दोन सामन्यांची कसोटी मालिका, मार्को जेनसेन ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / दरबान
शनिवारी येथे झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 233 धावांनी दणदणीत पराभव करत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. या सामन्यात 11 बळी घेणाऱ्या मार्को जेनसेनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 191 धावांत आटोपल्यानंतर लंकेचा पहिल्या डावात 13.5 षटकात 42 धावांत खुर्दा झाला. दक्षिण आफ्रिकेने 149 धावांची भक्कम आघाडी मिळवली. दक्षिण आफ्रिकेच्या जेनसेनने लंकेच्या पहिल्या डावात 13 धावांत 7 गडी बाद केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव 100.4 षटकात 5 बाद 366 धावांवर घोषित करुन लंकेला विजयासाठी 516 धावांचे कठिण आव्हान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात स्टब्ज आणि कर्णधार बहुमा यांनी शानदार शतके झळकाविताना चौथ्या गड्यासाठी 249 धावांची द्विशतकी भागिदारी केली. स्टब्जने 2 षटकार आणि 9 चौकारांसह 122 तर बहुमाने 228 चेंडूत 9 चौकारांसह 113 तसेच मार्कक्रेमने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 47, बेडिंग हॅमने 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 21 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेने खेळाच्या तिसऱ्या दिवशी चहापानावेळी आपल्या दुसऱ्या डावाची घोषणा केली.
लंकेच्या दुसऱ्या डावालाही डळमळीत सुरुवात झाली. खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर लंकेने दुसऱ्या डावात 5 बाद 103 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन त्यांनी शनिवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. त्यांच्या शेवटच्या 5 गड्यांनी 179 धावांची भर घातली. लंकेच्या दुसऱ्या डावामध्ये दिनेश चंडीमलने एकाकी लढत देत 174 चेंडूत 12 चौकारांसह 83 तर कर्णधार धनंजय डिस्लिव्हाने 81 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 59, कुशल मेंडीसने 77 चेंडूत 9 चौकारांसह 48, निशांकाने 4 चौकारांसह 23, मॅथ्यूजने 2 चौकारांसह 25, कमिंदू मेंडीसने 1 षटकारासह 10 धावा केल्या. दिनेश चंडीमल आणि धनंजय डिस्लिव्हा यांनी सहाव्या गड्यासाठी 95 धावांची भागिदारी केली. चंडीमलने 102 चेंडूत 8 चौकारांसह तर डिस्लिव्हाने 66 चेंडूत 9 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. उपहारावेळी लंकेची स्थिती 6 बाद 220 अशी होती. धनंजय डिस्लिव्हा बाद झाल्यानंतर चंडीमल आणि कुशल मेंडीस यांनी सातव्या गड्यासाठी 75 धावांची भागिदारी केली. चंडीमल बाद झाल्यानंतर लंकेचा डाव फारसा लांबला नाही. 79.4 षटकात लंकेचा दुसरा डाव 282 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेतर्फे जेनसेनने 73 धावांत 4, रबाडाने 65 धावांत 2, कोझीने 67 धावांत 2 आणि केशव महाराजने 67 धावांत 2 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेने ही कसोटी खेळाच्या चौथ्या दिवशी जिंकून मालिकेत विजयी सलामी दिली. जेनसेनने या सामन्यात 86 धावांत 11 गडी बाद केले. जेनसेन हा लंकेच्या पराभवाचा कर्दनकाळ ठरला. त्याने आपल्या 14 व्या कसोटीत 10 गडी पहिल्यांदाच बाद केले. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ आता आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत पहिल्या स्थानावर असून दक्षिण आफ्रिका दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या फेब्dरुवारीपासून दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत 7 पैकी 6 कसोटी सामने जिंकले आहेत. या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी येत्या गुरुवारपासून खेळवली जाईल.
संक्षिप्त धावफलक – दक्षिण आफ्रिका प. डाव 49.4 षटकात सर्व बाद 191, लंका प. डाव 13.5 षटकात सर्व बाद 42, द. आफ्रिका दु. डाव 100.4 षटकात 5 बाद 366 डाव घोषित (बहुमा 113, स्टब्ज 122, मार्कक्रेम 47, बेडिंगहॅम नाबाद 21, अवांतर 31), लंका दु. डाव 79.4 षटकात सर्व बाद 282 (चंडीमल 83, धनंजय डिस्लिव्हा 48, मॅथ्यूज 25, निशांका 23, अवांतर 23, जेनसेन 4-73, रबाडा 2-65, कोझी 2-67, केशव महाराज 2-67).









