वृत्तसंस्था/कार्डिफ
बुधवारी कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात द. आफ्रिकेने डकवर्थ-लुईस नियमच्या आधारे इंग्लंडचा 12 धावांनी पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 12 रोजी होईल. प्रारंभी, इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशिरा सुरु झाला. त्यामुळे खेळ 9 षटकांपर्यंत कमी करण्यात आला. आफ्रिकेच्या डावात 7 चेंडू शिल्लक असताना पुन्हा पाऊस पडला, ज्यामुळे त्यांचा डाव 7.5 षटकांत थांबवला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने 5 गडी गमावून 97 धावा केल्या होत्या.
आफ्रिकेकडून कर्णधार मार्करमने सर्वाधिक 28 धावांचे योगदान दिले. याशिवाय, डेवाल्ड ब्रेविसने 23, फेरारियाने नाबाद 25 तर ट्रिस्टन स्टब्जने 13 धावा केल्या. डकवर्थ-लुईस नियमानुसार इंग्लंडला 5 षटकांत 69 धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर इंग्लंडला 5 गडी गमावून फक्त 54 धावा करता आल्या. 69 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला प्रति षटक 13.8 च्या धावगतीने धावा हव्या होत्या. फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रुक दोघेही शून्यावर बाद झाले, ज्यामुळे इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जोस बटलरने 11 चेंडूत 25 धावांची जलद खेळी केली, परंतु आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. परिणामी इंग्लंडला पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.









