दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण, आजच्या इंग्लंड-अफगाण लढतीतील ‘नॉकआऊट’ स्वरूप
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दक्षिण आफ्रिका व ऑस्टेलिया यांच्यातील गट ब मध्ऋााrल सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला. मंगळवारी येथे दिवसभर पाऊस असल्याने या सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही. सामना सुरू होण्याच्या नियोजित वेळेनंतर तीन तास प्रतीक्षा केल्यावर पंचांनी सामना रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. सायंकाळी 7.32 ही कटऑफ वेळ ठरविण्यात आली होती. पण वातावरणात कोणतीही सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नसल्याने पंचांनी त्याआधीच आपला निर्णय जाहीर केला. द.आफ्रिका व ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला. त्यामुळे बुधवारी अफगाण व इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्याला ‘नॉकआऊट’ स्वरूप प्राप्त झाले आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर पडणारा तिसरा संघ असेल. स्पर्धेचे यजमान पाकिस्तान व बांगलादेश यांनी प्रत्येकी दोन सामने गमविल्याने तेही स्पर्धेबाहेर पडले आहेत. द.आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांनी आपापले पहिले सामने अनुक्रमे अफगाण व इंग्लंडविरुद्ध जिंकले आहेत.
विशेष रंजक बाब म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील मागील आठ सामन्यात रद्द झालेला हा ऑस्ट्रेलियाचा चौथा सामना आहे. त्यांचा पुढील सामना अफगाणविरुद्ध लाहोरमध्ये 28 फेब्रुवारी रोजी तर 29 फेब्रुवारी रोजी द.आफ्रिका व इंग्लंड यांची लढत कराचीमध्ये होईल. गट अ मधील उपांत्य फेरी गाठणारे संघ निश्चित झाले असून भारत व न्यूझीलंड या गटातून शेवटच्या चार संघांत स्थान मिळविले आहे.
रावळपिंडी व लाहोरमध्येही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने येत्या काही दिवसांत त्याचा अडथळा येऊ नये, अशी आशा पीसीबी करीत आहे. 29 वर्षांनंतर प्रथमच पाकमध्ये आयसीसीची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यजमान पाक संघ स्पर्धेतून बाहेर पडला असल्याने स्थानिक प्रेक्षकांना मैदानाकडे आकर्षित करण्याचे मोठे आव्हान पीसीबीला पेलावे लागणार आहे.









