परवाच एका गाण्याच्या कार्यक्रमाला जायचा योग आला थोडीफार गाणी सादर झाल्यानंतर निवेदीकेने एका वयस्कर गृहस्थांना स्टेजवर बोलवले. साधारण 85 च्या पुढचं वय असावं. त्यांना अलगद एका खुर्चीवर बसवलं. अर्थातच माझ्या मनात आलं, आता हे गृहस्थ काय सादर करणार? पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी त्यांच्या थरथरत्या हाताने अकॉर्डियन हे वाद्य पेललं आणि त्यांची बोटं जादूच्या कांडी सारखी फिरू लागली. कोणी शिकवायला नसताना स्वत: आरशासमोर उभे राहून शिकलेले हे वाद्य ते मी मी म्हणणाऱ्या जाणकारांच्या समोर सहज सादर करून गेले आणि कमालीचा आनंद प्रत्येकाला देऊन गेले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच त्यांच्यामध्ये असलेल्या चैतन्याच्या जिवंत झरा असल्याचा तो एक परिचय होता. त्यांच्या जगण्याची ती एक कमाई होती. त्यांनी मिळवलेला आनंदाचा ठेवा होता. जो फक्त वाटत चालले होते, उधळत चालले होते. समोरच्या प्रत्येकातला अणूरेणू आनंदाने ते खुलवत होते, आपण कुणाला काही देतोय ही भावनाच मुळी त्यांच्याजवळ नव्हती, अशी माणसं जगामध्ये एकच टक्का असतात. बाकीची 99 टक्के माणसं मी कुणाला काय दिलं, माझ्यामुळे कसा आनंद झाला, माझ्यामुळे कोण कसं शिकलं हे सांगण्यातच आपले आयुष्य घालवत फिरत असतात. परंतु या माणसांना एक गोष्ट लहानपणी शिकवायची राहूनच गेलेली असते. जंगलात मध गोळा करणाऱ्या मधमाशीच्या पिलांनी एकदा आपल्या आईला विचारलं आपण एवढा मध का गोळा करतो? आणि आपण स्वत: मात्र खातच नाही. ही माणसं आणि जंगलातले प्राणी मात्र त्याच्यावरती ताव मारत असतात. आपण मध कसा मिळवला याच्या बाता मारत असतात, आपण आता हे मध गोळा करायचं काम थांबवायला हवं! त्यावर आईने जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचे. आपला मध गोळा केल्यावर ऐतं खाणारे तेवढ्यापुरताच आनंद मिळवतात.
आपण मात्र हा मध गोळा करताना ज्या रंगीबेरंगी फुलांच्या साम्राज्यात हिंडतो, दवबिंदूंमध्ये न्हाहून निघतो, सूर्यकिरणांचे स्पर्श अनुभवतो, ते काही या माणसांच्या नशिबात नाही. आपल्यासाठी फुलांचे गुच्छ घेऊन ही झाडं स्वागताला कशी उभी असतात बघ. आपल्यातल्या प्रत्येकाला जणू ते प्रोत्साहन देत असतात. जगण्याचे मार्ग आपल्याला दाखवत असतात. आपला प्रत्येक क्षण ते सोनेरी करत असतात. म्हणून तर आपण फक्त आनंदाचे वारकरी होतो. आपला मध घेतला तरीही आपली आनंद वृत्ती आपलं कौशल्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते ज्याचं त्याला जन्माने मिळतं. हीच आपल्या जगण्याची पुंजी आहे ते निर्व्याजपणे फक्त वाटायचं. आणि हाच संस्कार पुढच्या पिढीवर करायचा असतो. माणसाच्या जगात असं पैशाच्या रूपात व्रेडिट देणाऱ्या पतसंस्था खूप असतात. तसंच आपल्या भोवती सुद्धा अनेक व्यक्ती देखील असतात.
क्रमश:








