एका ट्विटमुळे पसरल्या अफवा ः बीसीसीआय सचिवांना द्यावे लागले स्पष्टीकरण
@ वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली राजकारणात पाऊल ठेवणार असल्याची चर्चा होती. गांगुली हे भाजपकडून राज्यात मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असेही बोलले जात होते. परंतु गांगुलींनी राजकारणात उतरण्याचा निर्णय तेव्हा घेतला नव्हता. सौरव यांनी बुधवारी केलेल्या एका ट्विटमुळे मात्र वेगवेगळय़ा चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘हजारो लोकांना मदत होईल अशाप्रकारच्या गोष्टी सुरू करण्याची योजना आखत आहे’ असे सौरव यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
सौरव यांच्या या ट्विटनंतर ते बीसीसीआयचा राजीनामा दिला असल्याची अफवा पसरली होती. यामुळे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गांगुली यांनी राजीनामा दिला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. गांगुली हे राजकारणात उतरत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही दिवसभर सुरू होती.
2022 माझ्या क्रिकेटच्या जीवनातील 30 वे वर्षे आहे. 1992 मध्ये क्रिकेटला प्रारंभ केला होता. तेव्हापासून क्रिकेटने मला सर्वकाही दिले आहे. क्रिकेटमुळेच लोकांचे प्रेम मिळाले ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आयुष्यातील या प्रवासादरम्यान मदत केलेल्या, समर्थन दिलेलया लोकांचे मी आभार मानू इच्छितो. परंतु आज मी नवी सुरुवात करण्याची योजना आखत आहे. जीवनाच्या या नव्या अध्यायात तुम्ही सर्वजण अशाचप्रकारे स्वतःचे समर्थन देत रहाल असा विश्वास असल्याचे गांगुली यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मार्केटिंग व्हेंचर सुरू करणार?
ट्विटमधील ‘नवी सुरुवात’चा अर्थ गांगुली यांच्या एखाद्या नव्या प्रकल्पाशी संबंधित असल्याचा दावा एक ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराने केला आहे. याचबरोबर बीसीसीआय पदाधिकाऱयांनी गांगुली हे अध्यक्षपद सोडत नसल्याचे स्पष्ट केले आहे.