► वृत्तसंस्था/ कोलकाता
माजी भारतीय क्रिकेटपटू सौरभ गांगुलीच्या कारला अपघात झाला आहे. दुर्गापूर एक्स्प्रेस वेवरून तो आपल्या वाहन ताफ्यासह वर्धमानला जात असताना हा अपघात झाला. या अपघातात सौरभ गांगुली थोडक्यात बचावला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या ताफ्याच्या मध्यभागी एक लॉरी आल्यामुळे गाड्यांना आपत्कालीन ब्रेक लावावे लागले. या अपघातात गांगुली किंवा त्यांच्या कोणत्याही साथीदाराला दुखापत झाली नाही. मात्र, ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्यामुळे वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
सौरभ गांगुलीला वर्धमान विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जाताना मार्गात एक लॉरी मध्यभागी येताच चालकाने ताबडतोब ब्रेक लावले. परंतु ताफ्याच्या मागच्या गाड्या एकमेकांना आदळल्या. अपघातानंतर गांगुलीला काही मिनिटे घटनास्थळीच प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर तो कार्यक्रमासाठी रवाना झाला. सौरभ गांगुली हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष आहे. भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर नेण्यात त्याचे मोलाचे योगदान आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठ्या मालिका जिंकल्या असून परदेशातही प्रतिस्पर्ध्यांना चितपट केले आहे.









