कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
गणेशोत्सव दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. या उत्सवासाठी कुंभारवाड्यात मूर्तीकार मूर्तीच्या कामात व्यस्त झाले आहेत. तर उत्सवात साऊंड सिस्टमचा दणदणाट झालाच पाहिजे यासाठी गणेश मंडळांचे नियोजन सुरु झाले आहे. साऊंड सिस्टमचे आताच बुकिंग केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आवाजाची चाचणी तपासली जात आहे. मोकळया जागेत चाचणी घेतली जात आहे. मात्र या आवाजाच्या चाचणीने ग्रामस्थांचे हृद्या धडधडू लागले आहे. घराच्या भिंती थरथरु लागल्या आहेत. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
गणेशोत्सव आणि साऊंड सिस्टम समीकरण झाले आहे.उत्सवाच्या नावाखाली प्रचंड दणदणाट केला जात आहे. शासनाचे कितीही नियम आणि कायदे कितीही कडक असले तरी त्याला फाटयावर मारुन उत्सवात साऊंड सिस्टीम वाजवली जात आहे. गणेश आगमन आणि अनंत चतुर्थी मिरवणूकीत आवाजाची पातळी मर्यादा ओलांडते. प्रत्येक वर्षी उत्सवात या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्णांवर परिणाम होतो.पण त्यांकडे दुर्लक्ष केले जाते.
यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या उत्सवाची लगबग आतापासूनच सुरु झाली आहे. गणेश मंडळांकडून मूर्ती, मंडप, डेकोरेशनच्या तयारीचे नियोजन केले जात आहे. त्याबरोबर साऊंड सिस्टमकडे अधिक लक्ष दिले जात आहे. साऊंड सिस्टिम आणायची म्हंटल्यावर त्या सिस्टिमचा आवाज तपासला पाहिजे. या पार्श्वभूमीवर मंडळांकडून बुकिंग करण्यासाठी साऊंड सिस्टमचा आवाज तपासला जात आहे. यासाठी शहराला लागून असलेल्या मोकळया जागांचा वापर केला जात आहे. जागा मोकळी असली तरी परिसरात आजूबाजूला नागरी वस्ती आहे. यामुळे येथील नागरिकांना आवाजाच्या चाचणीचा प्रचंड त्रास होत आहे.
सरनोबतवाडीच्या हद्दीतील एका खासगी मालकीच्या रिकाम्या जागेत गेल्या काही दिवसापासून साऊंड सिस्टिमचा दणदणाट केला जात आहे. या रिकाम्या जागेला लागूनच लघुवेतन कॉलनी आहे. यामुळे कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक, रुग्ण,लहना मुलांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत आहे. सलग दोन ते तीन तास हा प्रकार चालू असतो. याठिकाणी एक मराठी शाळा, एक हायस्कूल पण आहे. पण या सर्वांचा विचार करणार कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ध्वनीप्रदूषण मोठया प्रमाणात होत असून याकडे संबंधित यंत्रणा लक्ष देणार का अशी विचारणा ग्रामस्थांतून होत आहे.
- तक्रार करणार कोण ?
मोठया आवाजाचा त्रास तर सर्वांनाच होतो.पण त्याविरोधात बोलण्याचे धाडस दाखवणार कोण असा प्रश्न आहे.तक्रार केलीच तर तक्रार करणारा संबंधित साऊंड सिस्टिमचा मालक आणि संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या डोळयात येतो.यामुळे तक्रार न करता मुकाटयाने सहन करणे हे सर्वसामान्यांच्या नशिबी आहे.
- 112 क्रमांकावर डायल करा
सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी पोलीसांचा 112 हा क्रमांक कार्यान्वित आहे. या क्रमांकावर तक्रार नोंदवली की पोलीस त्या ठिकाणी दाखल होऊन कारवाई करतात.यामुळे नागरिकांनी न घाबरता तक्रारीसाठी 112 क्रमांकावर फोन करावा.112 वर दखल न घेतल्यास पोलीसांशी संपर्क करावा.
-सुनिलकुमार क्षीरसागर-करवीर,उपविभागीय पोलीस अधिकारी








