पण एवढं मात्र खरे, की या पोरांना सिस्टीमचे व्यसनच लागले आहे.
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : एखाद्या सार्वजनिक सोहळ्यात कोणाची मूर्ती चांगली, कोणाची सजावट भारी, कोणाचा थाटमाट मोठा, यावर मंडला-मंडळात तालमी- तालमीत स्पर्धा लागली तर ती स्पर्धा कधीही चांगली, पण सिस्टीम कुणाची मोठी आणि आवाज कोणाचा दणक्यात, अशी स्पर्धा कोणत्याही जयंती सोहळ्याला मिरवणुकीला लागली आहे आणि कानात बोटे घालण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे.
मिरवणुकीच्या निमित्ताने काही मंडळांनी आवाज वाढवून आपली ताकद एकमेकाला दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मिरवणूक रात्री बाराला संपल्यानंतर त्या सिस्टीमच्या आवाजाचे तरंग आजही कानाभोवती आहेत, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. मंडळाच्या या उत्सवाबद्दल शंका नाही, मंडळाच्या एकजुटीबद्दल तक्रार नाही.
या मंडळाचे तरुण अडचणीच्या काळात धावून येत नाहीत, असे कोणीही म्हणू शकणार नाही आणि अशी खूप चांगली बाजू या मंडळांची असताना डॉल्बी सिस्टीमचा दणदणाट, लायटिंगचा धुरळा आणि घामाने अंग निथळेपर्यंत ‘नाच की नाच’ त्यामुळे जयंतीच्या सोहळ्यातली काही मंडळांची पोर टीकेचे लक्ष्य झाली आहेत.
कोल्हापुरात तर मुख्य रस्त्यावरून कानात बोटे घालूनच फिरायची काल काही मंडळांनी वेळ आणली आणि काही अपवादात्मक मंडळी सोडली तर बाकीच्यांनी आवाज वाढवता येईल, तेवढा वाढवण्याची संधी घेतली. कोल्हापुरात कोणताच कार्यक्रम साधासुधा होत नाही. घुघुळही हलगी घुमक्याच्या दणदणाटाशिवाय पूर्ण होत नाही.
दीपावली पाडव्याला म्हशींची मिरवणूकही दणक्यात निघते. सार्वजनिक सोहळ्यात तर साऊंड सिस्टीम आवश्यकच झाली आहे. फुटबॉलची मॅच जिंकली की गल्ली, पेठेच्या तोंडाला सिस्टीम बांधून तयार राहत आहे. मोहरम कारुण्याचा सण, पण त्यालाही दणदणाटाची जोड काही मंडळांनी दिली आहे आणि गणेशोत्सव, जयंती तर सिस्टीमशिवाय, डे मंडळाच्या पोरांना केवळ अशक्यच आहे.
अर्थात ही पोरं सिस्टीमवर बेधुंद होऊन नाचतात. कानाचे पडदे फाटतील इतका साऊंड वाढवतात. म्हणजे अगदी पार बाद झालीत, असेही नाही. पण एवढं मात्र खरे, की या पोरांना सिस्टीमचे व्यसनच लागले आहे. पोलीस कितीही नोटीसा काढू देत, सूचना देऊ देत, मंडळातले, गल्लीतले, पेठेतले ज्येष्ठ लोक कितीही समजावून सांगू देत, ही पोरं साऊंड सिस्टीम आणि लायटिंग याशिवाय सोहळा साजरा करू शकत नाहीत.
कोल्हापुरातल्या ६०-७० मंडळांवर ध्वनिमर्यादा ओलांडल्याचे गुन्हे दाखल आहेत. काही मंडळांवर गणेश विसर्जन मिरवणुकीला मनाई आहे. पण त्याचा फारसा परिणाम झालेला नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे दणदणाटाशिवाय मिरवणूक हे कोल्हापुरात केवळ अशक्य झाले आहे. ही परिस्थिती येण्याला काही कारणेडी निश्चित आहेत. कारण साऊंड सिस्टीम कितीही खर्चाची असली तरी तो खर्च पेलणारे काही देणगीदार सहज मिळत आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीतील इच्छुक, काही नेत्यांचे हात तर या मंडळांना देणगी देण्यासाठी सतत खुले आहेत. पोलिसांनी कारवाई केली तर ‘कडक कलमे लावू नका, पोर आपलीच आहेत, असे पोलिसांना सांगू शकणारे नेते आहेत आणि सिस्टीम असली तरच मिरवणुकीला पोरांची गर्दी होणार, याचा अंदाज मंडळांना आहे. त्यामुळे मिरवणुकीला दणदणाट दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या साऱ्या परिस्थितीचा त्रास इतर नागरिकांना काय होतो, याचे कोणालाही भान नाही.
कानात बोटे घातल्याशिवाय मिरवणूक कोणाला पाहताच येत नाही. लहान मुले आजारी लोक, ज्येष्ठ नागरिकांना हा आवाज सहन होत नाही. शिवाय मिरवणूक मार्गावरच्या व्यवसायिकांना किमान तीन-चार तास गिडाईक मिळत नाही. रोज कोणाशी ना कोणाची मिरवणूक ठरलेली. त्यामुळे व्यापाऱ्यांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परिस्थिती आहे. यावर कारवाई, निर्बंध, बंदी हे कडक उपाय निश्चित आहेत. पण त्याहीपेक्षा मंडळाने तालमीने स्वत:च जरा बदल करण्याची गरज आहे.
कारवाई करावी लागणार
“कोल्हापूरच्या तरुणांची एकमेकाला मदत करण्याची एक वेगळी भावना अनेक वेळा पोलिसांनी अनुभवली आहे. इथले तरुण डॉल्बी वाजायला लागला की मात्र कोणाचे काही ऐकत नाही. कायदेशीर कारवाई निश्चित करू शकतो. पण कोणा तरुणाचे भावी आयुष्य बरबाद होऊ नये, असे वाटते. त्यामुळे मंडळ, तालमीच्या प्रमुखांनी सिस्टीमच्या गंभीर प्रकरणात लक्ष घालावे. कोणाचाही कधी दबावही नाही. पण अति झाले की कारवाई अटळ आहे, याची कोल्हापुरातल्या तरुणांनी दखल घ्यावी.”
– संजीव झाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जुना राजवाडा








