वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात व गणपती बाप्पाच्या जयघोषात लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारिहाळ, करडीगुद्दी, सुळेभावी, कणबर्गी, कलखांब, मुचंडी, अष्टे, चंदगड खनगाव आदी गावामध्ये सकाळपासूनच गणेश भक्तांची घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू होती. पारंपरिक वाद्ये व फटाक्यांच्या गजरात घरगुती गणेशमूर्ती नेण्यात येत होत्या. काही ठिकाणी पालखीमधून गणेशमूर्ती नेण्यात येत होत्या. दुपारपर्यंत घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी मूर्तीशाळेसमोर भक्तांनी गर्दी केली होती. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मूर्ती आणण्यास प्रारंभ झाला. यावर्षी प्रशासनाने गणेशोत्सवात डॉल्बीवर पूर्णत: बंदी आणल्याने अनेक मंडळांनी टाळ, मृदंग, लेझीम, बँड, बेंजो व झांजपथक आदी वाद्यांच्या गजरात सार्वजनिक गणेश मूर्ती आणल्या . रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेशमूर्ती नेण्यात येत होत्या. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीवर प्लास्टिक झाकले होते. हलक्या सरी वगळता दिवसभर पावसाने चांगली साथ दिली होती. मात्र सायंकाळी सातनंतर पावसाचा जोर वाढल्याने गणेश भक्तांची गैरसोय झाली.









