ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अजित पवार मविआचे प्रमुख नेते आहेत. त्यांचा आणि माझा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा आहे. त्यामुळे आम्ही पटकन बोलून जातो. काल मला पत्रकारांनी अजितदादांबद्दल अर्धवट माहिती देऊन प्रश्न विचारला. त्यावर मी कडक शब्दात उत्तर दिले. याचा मला खेद वाटतो. मी असे बोलायला नको होते, असे सांगत खा. संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांची माफी मागितली आहे.
खा. राऊत यांच्या ऑन कॅमेरा थुंकण्याच्या कृतीवरुन अजित पवार यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना संयमाने वागण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मीडियाने राऊतांना अजित पवारांच्या प्रतिक्रियेबद्दलची अर्धवट माहिती दिली. त्यामुळे धरणात *** पेक्षा थुंकणं चागलं. अशा शब्दात राऊतांनी अजित पवारांना फटकारले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद वाढण्याची चिन्हे होती. मात्र, राऊतांनी यावर खुलासा करत त्यावर पडदा पाडला.
राऊत म्हणाले, मला अजित पवारांविषयी अर्धवट माहिती देऊन प्रश्न विचारला गेला. अजित पवारांनी तुमच्याविषयी असं असं बोलले. मात्र, ते असं बोलले नाहीत. अजित पवार म्हणाले होते की महाराष्ट्रात संयमाने वागलं पाहिजे. त्यांचं म्हणणं योग्य आहे, मी सहमत आहे. पत्रकारांच्या अर्धवट माहितीमुळे मी काल अजित पवारांद्दल जे बोललो त्याचा मला खेद वाटतो. यापुढे मी ठरवलं आहे की, संपूर्ण भूमिका ऐकल्याशिवाय मी त्याविषयावर बोलणार नाही.