अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा : भारत-बांगलादेशचे नावही यादीत सामील
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष करणारे कुख्यात अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या मोठ्या कटाचा खुलासा केला आहे. अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या संघटनांनी भारत आणि बांगलादेश समवेत अनेक देशांमध्ये उलथापालथ घडवून आणण्यासाठी युएस एजेन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटकडून (युएसएड) 26 कोटी डॉलर्स प्राप्त केले. सोरोस यांनी या रकमेचा वापर जगभरातील देशांमध्ये अराजकता फैलावणे आणि सरकार पाडविण्यासाठी केल्याचा दावा अध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे. जॉर्ज सोरोसने युएसएडकडून 26 कोटी डॉलर्स प्राप्त केले आणि या रकमेचा वापर श्रीलंका, बांगलादेश, युक्रेन, सीरिया, इराण, पाकिस्तान, भारत, ब्रिटन आणि अमेरिकेत अराजकता फैलावणे, सरकार बदलणे आणि वैयक्तिक लाभासाठी केला, असे ट्रम्प यांनी एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रशासनाने युएसएडचा निधी गोठविला असून अमेरिकन विदेशी सहाय्याच्या चौकशीला वेग दिला असताना ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली आहे.
सोरोस यांच्या संघटनेला मोठा निधी
मागील 15 वर्षांमध्ये युएसएडने जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी फौंडेशनसोबत भागीदारी करणारी संघटना ईस्ट-वेस्ट मॅनेजमेंट इन्स्टीट्यूटला 27 कोटी डॉलर्सहून अधिक निधी पुरविला. याबद्दल झालेल्या खुलाशामुळे आंतरराष्ट्रीय राजकीय आंदोलनात अमेरिकन प्रशासनाच्या भूमिकेवरून चिंता वाढली आहे. आकडेवारीनुसार संघटनेला अनेक करारांच्या अंतर्गत आणखी 9 कोटी डॉलर्स देण्यात आले आहेत.
युएसएडकडून भरीव आर्थिक सहकार्य
सोरोस यांच्या संघटनेशी निगडित ईस्ट-वेस्ट मॅनेजमेंट इन्स्टीट्यूट स्वत:च्या मिशनला ‘सरकार, नागरिक समाज आणि खासगी समुदायांदरम्यान सहकार्याला चालना देत लोकशाहीवादी समाजाला मजबूत करणे आणि पारदर्शक तसेच उत्तरदायी संस्थांची निर्मिती करणारे संबोधिते. याच्या अहवालानुसार याचे फंडिंग मुख्यत्वे युएसएड आणि अमेरिकेच्या विदेश विभागाकडून प्राप्त होते. ट्रम्प यांनी युएसएडच्या निधीला रोखल्याने आता सोरोस यांच्या संघटनांची अडचण होणार आहे. ट्रम्प यांच्याकडून आता युएसएडच्या निधी वापराबद्दल चौकशीचा निर्णय घेण्यात आला आहे.
अराजकता फैलावण्यासाठी कुख्यात
सोरोसकडून समर्थित अन्य एक संस्था अँटी-करप्शन अॅक्शन सेंटरदेखील युएसएडला स्वत:चा सर्वात मोठा देणगीदार संबोधिते. या संस्थेच्या एकूण देणगीत युएसएडचा वाटा 20.7 टक्के इतका आहे. या फंडिंगवर अमेरिकेत आता कठोर टीका होत आहे. टीकाकारांनी युएसएडवर सोरोस यांच्यासाठी खासगी बँकेच्या स्वरुपात काम करण्याचा आरोप केला आहे. सोरोस हा अनेक देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी कुख्यात आहे. सोरोस हे डोनाल्ड ट्रम्प यांचे तीव्र विरोधक आहेत. ट्रम्प यांच्या विरोधातील प्रचाराकरता त्यांनी मोठी रक्कम खर्च केल्याचे समोर आले आहे. तर मागील जो बिडेन प्रशासनाने सोरोस यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला होता.









