महापौर रोहित मोन्सेरात यांची माहिती
पणजी : पणजी मार्कोटातील सोपो करात झालेल्या घोटाळ्याची महानगरपालिकेने चौकशी सुरू केल्याची माहिती पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली आहे. आता यापुढे सोपो कर गोळा करण्याचे काम खासगी कंत्राटादाराकडे देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी सोपो करात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महापौर व पणजी मनपा खडबडून जागी झाली असून त्या घोटाळ्याची चौकशी करण्याचा निर्णय झाल्याचे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. मोन्सेरात पुढे म्हणाले की आपण पणजी मनपा आयुक्तांशी या प्रकरणी चर्चा केली असून सोपो घोटाळ्याची चौकशी करण्याचे ठरविले आहे. पावती न देता सोपो कर गोवा करणे पूर्णपणे चुकीचे असून त्याला कोण जाबाबदार आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. सोपो कराचे पैसे कोणी घेतले आणि ते काय केले? याची चौकशी करण्यात येणार आहे. जो कोणी याला जबाबदार असेल त्यावर कारवाई करणार असल्याची ग्वाही महापौर मोन्सेरात यांनी दिली आहे. या सोपो कर घोटाळ्यामुळे पणजी मनपाचे लाखो रुपये बुडाले असून ते आता कसे काय वसूल करणार? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आता चौकशीतून नेमके काम बाहेर येते ते पहावे लागेल.









