वृत्तसंस्था / ऑकलंड
न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि अष्टपैलु सोफी डिव्हाईनने आगामी होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. चालु वर्षाच्या अखेरीस आयसीसीची महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने होणार आहे.
35 वर्षीय सोफी डिव्हाईन ही न्यूझीलंड महिला क्रिकेटमधील एक अव्वल अष्टपैलु म्हणून ओळखली जाते. तिने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 152 वनडे सामन्यात 8 शतकांसह 31.66 धावांच्या सरासरीने 3990 धावा जमविल्या आहेत. तसेच तिने 146 टी-20 सामन्यात एका शतकासह 3431 धावा जमविल्या आहेत. डिव्हाईनने वनडे क्रिकेटमध्ये 107 तर टी-20 प्रकारात 119 गडी बाद केले आहेत.
क्रिकेट न्यूझीलंडकडून बुधवारी मध्यवर्ती करार करण्यात आलेल्या 17 महिला खेळाडूंची घोषणा केली जाणार आहे. मात्र भविष्यकाळात क्रिकेटच्या टी-20 प्रकारासाठी आपण उपलब्ध राहीन, असे तिने सुचित केले आहे. 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान आयसीसीची महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. आपल्यावर मानसिक ताण जाणवत असल्याने गेल्या जानेवारीमध्ये तिने काही कालावधीसाठी क्रिकेटपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. 2020 साली न्यूझीलंड महिला संघाच्या कर्णधारपदी डिव्हाईनची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर तिने न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला चांगले यश मिळवून दिले. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डिव्हाईनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने कांस्यपदक मिळविले होते तर 2024 साली न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती आणि सोफी डिव्हाईनकडे संघाचे नेतृत्व होते. सोफी डिव्हाईनने आपल्या जवळपास 20 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत कामगिरीत सातत्य राखले तसेच क्रिकेट न्यूझीलंडच्या मिळालेल्या सहाकाऱ्यामुळे संघाला यश मिळवून देता आले, असेही डिव्हाईनने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. भारतात होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड महिला संघाचा पहिला सामना बलाढ्या ऑस्ट्रेलियाबरोबर 1 ऑक्टोबरला इंदोरमध्ये होणार आहे.









