खासदार जगदीश शेट्टर यांची माहिती : विमानतळ सल्लागार समितीची बैठक
बेळगाव : बेळगाव शहरापासून विमानतळापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी गर्दी असते. त्यामुळे विमानतळावर वेळेवर पोहचणे कठीण होत आहे. यावर मात करण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम प्रास्तावित आहे. राज्य सरकारने यापूर्वीच या रस्त्याच्या कामाला 50 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी बेळगाव विमानतळ सल्लागार समितीची बैठक खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सल्लागार समितीच्या सदस्यांनी विमानतळाच्या विकासाबाबत अनेक प्रश्न विकसित केले. प्रारंभी खासदारांनी अधिकाऱ्यांकडून विमानतळावरून सुरू असलेल्या विमानफेऱ्यांची माहिती घेतली. त्याचबरोबर नागरिकांच्या मागणीनुसार पुणे, चेन्नई, जोधपूर आणि तिरुपती या शहरांना विमानसेवा करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीच्या कामाची स्थिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती करून घेतली. तसेच काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. सध्याच्या विमानतळाचे आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये रुपांतर करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी विमानतळ संचालक एस. त्यागराज, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य राहुल मुचंडी, हनुमंत कागणकर, स्नेहल कोलकार, भद्रा, राजू देसाई, जयसिंह रजपूत, भरत देशपांडे यांसह इतर उपस्थित होते.









