सोनम कपूर विवाह अन् मुलाच्या जन्मानंतर मोठ्या पडद्यापासून दूर राहिली आहे. तरीही ती कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत राहते. कॉफी विद करणच्या सीझन 7 मधील तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. सोनम कपूर ही स्वत:चे म्हणणे बिनधास्तपणे मांडण्यासाठी ओळखली जाते.
विवाहाच्या चार वर्षांनी सोनम कपूर आणि आनंद आहुजा या दांपत्याला 2022 मध्ये पुत्र झाला असून त्याचे नाव वायू ठेवण्यात आले आहे. मुलगा काहीसा मोठा झाल्याने सोनम आता चित्रपटसृष्टीत पुन्हा सक्रीय होण्याची तयारी करत आहे.
मी पुन्हा अभिनय करणार आहे, भले मग लोकांनी मला नाकारले तरीही बेहत्तर. सध्या ज्या भूमिकांचा प्रस्ताव मिळत आहे, ते 20 वर्षीय युवतीचे आहेत. मी आता जान्हवी कपूर किंवा खुशी कपूरसारखी तरुण नाही, परंतु लोकांना मी अजूनही नवतरुणी असल्याचे वाटते हे कळल्यावर आनंद झाल्याचे सोनमने म्हटले आहे.
सोनम सध्या दिल्ली आणि लंडन येथे वास्तव्यास आहे. अशास्थितीत तिने बॉलिवूडमध्ये अत्यंत मोजके प्रोजेक्ट्स करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता ती चोखंदळपणे भूमिकांची निवड करत आहे. सोनम ही बॉलिवूडमध्ये फारशी यशस्वी ठरलेली नाही. अशा स्थितीत तिला फार गंभीर भूमिका मिळणार नसल्याचे मानले जात आहे.









