सरकारने बोलाविली दूरसंचार कंपन्यांची बैठक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॉल ड्रॉप आणि स्लो डाटा स्पीडमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. देशभरातून कॉल ड्रॉप आणि स्लो इंटरनेटच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. परंतु आता लवकरच कॉल ड्रॉप आणि स्लो इंटरनेट स्पीडपासून मुक्तता मिळणार आहे. दूरसंचार कंपन्यांना सेवांची गुणवत्ता सुधारण्याचे निर्देश देण्याची तयारी सरकारने चालविली आहे.
दूरसंचार सचिवांनी दूरसंचार कंपन्यांची 28 डिसेंबर रोजी बैठक बोलाविली आहे. युजर्सना कॉल ड्रॉप आणि स्लो डाटा स्पीडप्रकरणी दिलासा मिळावा असा दूरसंचार मंत्रालयाचा प्रयत्न आहे. दूरसंचार सचिव कंपन्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेत याप्रकरणी पावले उचलणार आहेत.
या बैठकीत दूरसंचार सचिवांसह विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व मोठय़ा दूरसंचार कंपन्यांचे उच्चाधिकारी सामील होणार आहेत. 5जी सेवा सुरू हानही दूरसंचार कंपन्यांची सेवा सुधारलेली नसल्याचे दूरसंचार विभागाचे मानणे आहे. दूरसंचार सेवेच्या गुणवत्तेवरून सरकार फारसे समाधानी नाही. दूरसंचार विभागाने यासंबंधी दूरसंचार नियामक प्राधिकरणाला पत्र लिहून दूरसंचार कंपन्यांच्या सेवांबद्दल कठोर नियम लागू करण्याची मागणी केली आहे.
28 डिसेंबर रोजीच्या या प्रस्तावित बैठकीत दूरसंचार विभाग सर्व दूरसंचार कंपन्यांना सेवांमध्ये सुधारणा करण्याचा निर्देश देणार आहे. कंपन्यांना 5जीच्या काळात स्लो इंटरनेट स्पीडच्या त्रुटी दूर करत आणि कॉल ड्रॉपची समस्या संपविण्याशी संबंधित दिशानिर्देश दिले जाणार आहेत.









