लोकसभा आचारसंहिता संपताच कार्यवाही
प्रतिनिधी/ बेळगाव
जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ग्राम पंचायत सचिवांना उपनोंदणी अधिकारीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रशिक्षण संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच याची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक कागदपत्रे वेळेत व सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भूमी विभागासंदर्भातील सातबारा उतारे ग्राम पंचायत पातळीवर वितरित करण्यात येत आहेत. आता जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रही अधिक सुलभपणे उपलब्ध व्हावीत, यासाठी ग्राम पंचायत पातळीवरच नोंदणी करून ग्रा. पं. सचिवांच्या माध्यमातून ही प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याच्या उद्देशाने संबंधित अधिकाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधील सर्व ग्राम पंचायतींच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भातील पाच दिवस प्रशिक्षण देण्यात आले. ग्राम पंचायतीमधील ग्रेड-1, ग्रेड-2 क्लार्क कम डाटा एंट्री ऑपरेटर यांना सदर प्रशिक्षण देण्यात आले आहे. सचिवांच्या गैरहजेरीत डाटा एंट्री ऑपरेटरनाही हे प्रमाणपत्र देण्याची सोय व्हावी, यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून लोकसभा निवडणुकांची आचासंहिता संपताच राज्य सरकारकडून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जन्म किंवा मृत्यूच्या घटनेची 21 दिवसांपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर नोंद केल्यास दंड आकारला जाणार आहे. ही प्रमाणपत्रे ग्राम पंचायत पातळीवर उपलब्ध झाल्यास नागरिकांना सोयीचे ठरणार आहे.









