उपचारासाठी दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल ः सोनियांनंतर प्रियांकालाही संसर्ग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला नाही. आता प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ईडीने सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले होते. यापूर्वी त्या 8 जूनला हजर होणार होत्या, मात्र कोरोनामुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे. आता त्यांना पुन्हा नोटीस पाठवण्यात आली असून 23 जूनपूर्वी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीस प्रियांका गांधी यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी झाली आहे. प्रियांका गांधी यांनी स्वतः ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रियांका यांनी केले होते. संसर्ग होण्यापूर्वी प्रियांकाने लखनौमध्ये नवसंकल्प शिबिर कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सोनिया गांधी यांच्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.









