भाजपचा गंभीर आरोप : मतदारसूचीत नाव समाविष्ट केल्यासंबंधीचे पुरावेही सादर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा सदस्या सोनिया गांधी या भारताच्या नागरिक होण्याआधीच त्यांचे नाव मतदारसूचीत समाविष्ट करण्यात आले होते, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. यासंबंधीचे पुरावेही या पक्षाने सादर केले आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हा आरोप बुधवारी एका पत्रकार परिषदेत केला. याप्रसंगी त्यांनी काही कागदपत्रेही सादर केली आहेत. सोनिया गांधी यांचे नाव मतदार म्हणून 1980 च्या मतदारसूचीत समाविष्ट करण्यात आले आहे. तथापि, त्यावेळी त्या भारताच्या नागरिक नव्हत्या. त्यांना भारताचे नागरिकत्व 1983 मध्ये मिळाले. याचाच अर्थ, मतदारसूचीत त्यांचे नाव त्या नागरिक बनण्याच्या आधीच तीन वर्षे समाविष्ट करण्यात आले, असे प्रतिपादन त्यांनी या पत्रकार परिषदेत केले. त्यांनी ती मतदारसूचीही सादर केली.
मालवीय यांचे पुरावे
हाच आरोप भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनीही ‘एक्स’वर संदेश प्रसारित करून केला आहे. 1980 मध्ये दिल्लीच्या सफदरजंग मार्ग येथील मतदान केंद्र क्रमांक 145 वरच्या मतदारसूचीत इंदिरा गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी आणि मनेका गांधी यांची नावे दिसून येतात. त्यावेळी सोनिया गांधी यांच्याकडे इटलीचेच नागरिकत्व होते. त्या त्यावेळी भारताच्या नागरिक झालेल्या नव्हत्या. तरीही त्यांचे नाव अवैधपणे मतदारसूचीत समाविष्ट करण्यात आले होते, असा संदेश मालवीय यांनी प्रसारित केला आहे.
हा तर मोठाच घोटाळा
जी व्यक्ती देशाची नागरिक नाही, तिचे नाव मतदारसूचीत कसे समाविष्ट केले जाते, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाने उपस्थित केला. हा सर्वात मोठा मतदारसूची घोटाळा असून तो काँग्रेसने केला आहे. सोनिया गांधी यांनी यासंबंधीचे स्पष्टीकरण द्यावे. सोनिया गांधी यांचा जन्म इटलीत 1946 मध्ये झाला. राजीव गांधी यांच्याशी त्यांचा विवाह 1968 मध्ये झाला. त्यानंतर त्या भारतात वास्तव्य करु लागल्या. तथापि, त्यांनी भारताचे नागरिकत्व 1983 मध्ये घेतले. पण मतदार म्हणून त्या 1980 पासूनच समाविष्ट आहेत, असा हा आरोप आहे.
पूर्वीही होता आक्षेप
सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वासंबंधी आणि त्यांच्या मतदारसूचीतील समावेशाविषयी त्यावेळी आक्षेप व्यक्त करण्यात आले होते. त्यांचे नाव मतदारसूचीत आले कसे, हा प्रश्न 1981 मध्ये प्रथम विचारण्यात करण्यात आला होता. त्यांनी केव्हा भारताचे नागरिकत्व स्वीकारले, यावरही बराच वाद त्यावेळी झाला होता. पुढे हे प्रकरण थंड झाले होते. तथापि, आता काँग्रेसने निवडणूक आयोगावरच मतचोरीचा आरोप केल्याने हेही प्रकरण पुन्हा उपस्थित झाले आहे.









