नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी शनिवारी ट्विट करत दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार त्या आयसोलेट झाल्या आहेत. तसेच संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान राहुल गांधी यांनादेखील अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी अलवर दौरा रद्द केला आहे.
सोनिया गांधी यांना दुसऱयांदा कोरोनाची लागण झाली आहे. 2 जून 2022 ला सोनिया गांधी यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जूनमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्या आपल्या निवासस्थानीच विलगीकरणात राहत आहेत.









