व्हिडिओ केला जारी : राज्यातील हिंसक स्थिती विदारक
►वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मणिपूर हिंसेसंबंधी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओद्वारे सोनिया गांधी यांनी मणिपूरच्या लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. मणिपूरच्या लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या अभूतपूर्व हिंसेने आमच्या देशाच्या अंतरात्म्यावर घाव घातला आहे. स्वत:चे घरदार सोडून लोकांना पलायन करावे लागत असल्याचे पाहून मोठे दु:ख झाल्याचे सोनिया गांधींनी व्हिडिओद्वारे म्हटले आहे.
जवळपास 50 दिवसांपासून मणिपूरमध्ये एक मोठी मानवीय आपत्ती आम्ही पाहिली आहे. या हिंसेने अनेक लोकांना हादरवून सोडले आहे. या हिंसेत स्वकीयांना गमाविणाऱ्या सर्व लोकांबद्दल संवेदना व्यक्त करते. शांततापूर्ण पद्धतीने राहणाऱ्या आमच्या सर्व बंधुभगिनींना परस्परांच्या विरोधात होत असल्याचे पाहणे विदारक असल्याचे त्या म्हणाल्या.
बंधुभावाच्या भावनेला बळ देण्यासाठी मोठा विश्वास अन् सद्भावनेची गरज असते. तर द्वेष आणि विभाजनाच्या आगीला भडकविण्यासाठी एक चुकीचे पाऊल पुरेसे असल्याचे वक्तव्य सोनिया गांधी यांनी केले आहे. मणिपूरच्या लोकांकडून मला अपार आशा अन् विश्वास आहे, तसेच आम्ही मिळून या संकटातून बाहेर पडू हे माहित आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.









