ग्रामस्थांचा पेडणे पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा : स्थानिक आमदारांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप
प्रतिनिधी /पेडणे
सोणये – पालये तुये पंचायत क्षेत्रात भर पावसात नळाला पाणी येत नसल्याने या भागातील नागरिकांची पाण्याविना हाल होत असून या भागातील नागरिकांनी बुधवारी पेडणे पाणी विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन या विभागाचे सहाय्यक अभियंते संदीप मोरजकर यांना जाब विचारला.
गेले एक वर्ष या भागात अनियमित पाणी येते. गेले दोन महिने तर या भागात पाणी येत नसल्याने या भागातील नागरिकांची पाण्याविना भर पावसात वणवण करत आहेत. अनेक वेळा पाण्यासाठी याचना करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यास पाणी पुरवठा विभाग अपयशी ठरल्याने त्याचा उदेक म्हणून स्थानिक नागरिकांनी बुधवारी पेडणे पाणी विभागाच्या कार्यालयावर माजी पंचायत सदस्य उदय मांदेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेत संबंधित अधिकाऱयाला जाब विचारला. यावेळी तुये पंचायतीचे माजी सरपंच सुहास नाईक , अनिकेत मुरारी, एल्सी डिसोजा , जेनिफर त्रिदांत , आलेक्स डिसोझा आदी उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी पेडणे पाणी विभागाचे सहाय्यक अभियंते संदीप मोरजकर यांना जाब विचारत गेले अनेक महिने या भागात पाणी आम्हाला येत नाही मात्र मे महिन्यात आणि यापूर्वी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जायचा आता पाऊस पडत असल्याने हा पाणीपुरवठा का बंद केला? असा प्रश्न उपस्थित करून आमची पाणी समस्या केव्हा सोडविणार असा प्रश्न करत पाणी समस्या या भागातील लवकर सोडवावी अशी मागणी उदय मांदेकर यांनी केली.
यावेळी संदिप मोरजकर यांनी आपण आज नाहीतर उद्या दोन दिवसात rत्या ठिकाणी जाऊन पाहणी करतो.जर वाल तसेच पाईपलाईनची समस्या आहे तर त्याची तपासणी करून हा विषय सोडवण्याचे आश्वासन यावेळी सोणये पालये येथील ग्रामस्थांना पाणी विभागाचे सहाय्यक अभियंता संदीप मोरजकर यांनी दिले.
यावेळी बोलताना ऍल्सी डिसोझा म्हणाल्या की आम्ही पाण्यासाठी गेले अनेक दिवस संघर्ष करत आहोत. मात्र भर पावसात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना आमच्या नळाला पाणी येत नाही. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी स्थानिक आमदार यांनी लक्ष देण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना उदय मांदेकर म्हणाले की पाण्याचा समस्या मांदे मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात आहे. सोणये पालये येथील पाण्याची समस्या गेली अनेक वर्ष सुरू आहे. या भागात मांदे मतदारसंघात 30 एम. एल .डी पाणी प्रकल्प होणार असे राजकीय नेते सांगतात .मात्र तो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून बराच अवधी असल्याने आता सध्या पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. प्मांदेचे आमदार जीत आरोलकर यांचे या विषयाकडे लक्ष नसल्याचा आरोप त्यांनी केला.